जिद्दीला सलाम! ११ वर्षांनी १२ वी; ४२ व्या वर्षी अधिकारी; UPSC मध्ये शेवटून पहिले आलेले महेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 05:14 AM2024-04-20T05:14:25+5:302024-04-20T05:16:23+5:30
यूपीएससी यादीत शेवटून पहिले आलेले महेश कुमार यांचा प्रेरणादायी संघर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) निकाल लागल्यानंतर टॉपर्सवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, सध्या आणखी एका उमेदवाराची चर्चा होत असून, तो यूपीएससीच्या यादीत शेवटून पहिला म्हणजेच १०१६ वा आला आहे. महेश कुमार असे या उमेदवाराचे नाव असून, त्यांनी परिस्थितीशी झगडत, अनेक संकटांवर मात करत त्यांनी वयाच्या ४२व्या वर्षी यश मिळविले आहे. कितीही संकटे आली तरी जिद्द न सोडल्यास यश मिळतेच हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
मूळचे बिहारमधील मुजफ्फरपूरचे रहिवासी असलेले महेश कुमार तुर्की खराट या गावात परिवारासह राहतात. कधीकाळी हा परिसर नक्षलवादी कारवायांनी प्रभावित होता. महेश कुमार यांचे वडील हे गावोगावी भटकून तांदूळ आणि डाळ विकायचे.
सध्या कोर्टात क्लर्क म्हणून काम सध्या महेश कुमार शेखपुरा जिल्हा कोर्टात क्लर्क म्हणून काम करतात. नोकरी करत त्यांनी यूपीएससीचा अभ्यास करत हे यश मिळविले आहे. महेश कुमार यांच्या या यशानंतर त्यांच्या कुटुंबात आणि सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महेश कुमार यांनी तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे.
गरिबीने शाळा सुटली, मात्र...
महेश कुमार १९९५ साली दहावी पास झाले, त्यावेळी ते शाळेत पहिले आले होते, पण घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे त्यांना शाळा सोडावी लागली, पण शिक्षणाची आवड असलेल्या महेश यांनी तब्बल ११ वर्षांनंतर म्हणजेच २००८ साली १२ वीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. यानंतर २०११ साली त्यांनी पदवी घेतली आणि २०१३ साली टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन कंत्राटी शिक्षक बनले.
दिवसभर नोकरी, रात्री अभ्यास
- २०१८ मध्ये त्यांनी क्लर्क म्हणून काम सुरू केले. यानंतर २०२३ मध्ये बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी धरली. नोकरी करताना महेश कुमार यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरू केला.
- दिवसभर शिक्षकाची नोकरी आणि रात्री अभ्यास, असा महेश यांचा दीनक्रम होता. यूपीएससीच्या पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश आले, पण ते खचले नाहीत. अभ्यास कायम ठेवला आणि तिसऱ्या प्रयत्नात वयाच्या ४२ व्या वर्षी यश संपादन केले आहे.