तिकीट मिळताच उमेदवाराचे आनंदाश्रू अनावर; म्हणाला, 'विकासाच्या मुद्द्यावर मतं मागणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 08:14 PM2022-02-03T20:14:11+5:302022-02-03T20:23:55+5:30
UP Assembly Elections 2022 : जालौनच्या ओराई विधानसभा जागेसाठी समाजवादी पार्टीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भावनिक दृश्य पाहायला मिळाले.
जालौन : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची सर्व राजकीय पक्षांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. पक्ष कार्यालयात तिकीट मिळविण्यासाठी नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. भाजपा, समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बसपासोबतच सर्वच पक्षांनी बहुतांश जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. अशातच जालौनच्या ओराई विधानसभा जागेसाठी समाजवादी पार्टीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भावनिक दृश्य पाहायला मिळाले. ओराई विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीने माजी मंत्री दयाशंकर वर्मा यांना उमेदवारी घोषित केली आहे.
दरम्यान, ओराई विधानसभेच्या जागेसाठी समाजवादी पार्टीच्या उमेदवाराबाबत बराच गोंधळ उडाला होता. प्रदीर्घ विचारमंथनानंतर समाजवादी पार्टीने या जागेसाठी दयाशंकर वर्मा यांच्या नावाची घोषणा केली, त्यावेळी समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. तिकीट मिळताच दयाशंकर वर्मा ढसाढसा रडू लागले, त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यासंबंधीचे वृत्त झी न्यूज हिंदी वेबसाइटने दिले आहे.
'विकासाच्या मुद्द्यावर मते मागणार'
निवडणुकीच्या रणनीतीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना समाजवादी पार्टीचे उमेदवार दयाशंकर वर्मा म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावर लोकांकडे मते मागणार आहे. जात किंवा धर्म हा त्यांचा निवडणुकीचा मुद्दा असणार नाही. दरम्यान, ओराईमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
सात टप्प्यात विधानसभा निवडणूक
दरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे.