१०० आमदार फोडा, मुख्यमंत्री बना; उपमुख्यमंत्र्यांना खुली ऑफर, भाजपाचाही पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 11:39 AM2022-12-04T11:39:59+5:302022-12-04T11:40:27+5:30
पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत
लखनौ - उत्तर प्रदेशात २ विधानसभा, १ लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होत आहे. याठिकाणी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यात समाजवादी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीत यांच्यात थेट लढत आहे. ज्याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे त्यात रामपूर आणि मुरादाबादच्या खतौली विधानसभेचा समावेश आहे तर मैनपुरी लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे.
पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. याचवेळी रामपूर निवडणुकीत प्रचार करताना समाजवादीचे पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यूपीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना १०० आमदार फोडा आणि मुख्यमंत्री बना अशी खुली ऑफर दिली आहे. अखिलेश यादव यांचं असं विधान पहिल्यांदाच आलंय असं नाही तर याआधीही व्यासपीठावरून त्यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ऑफर दिलीय. पण यावेळी उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनाही ही ऑफर दिली.
अखिलेश यादव नेमके काय म्हणाले?
अखिलेश यादव रामपूरमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी यूपीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, हे लोक ठिकठिकाणी येऊन सांगत आहेत की आम्ही माफिया आहोत, आम्ही लोकांना गुन्हेगार म्हणतो, पण मुख्यमंत्री कधी होणार या द्विधा मन:स्थितीत ते आहेत. मी यापूर्वीही ऑफर दिली होती, मी रामपूरमधूनही ऑफर देत आहे. १०० आमदार तुमच्यासोबत आणा, आम्ही १०० आमदारांसह तुमच्यासोबत तयार आहोत, सरकार बनवा आणि मुख्यमंत्री व्हा. तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून फिरताय, उपमुख्यमंत्र्यांमध्ये काय आहे? असा सवाल त्यांनी केला.
अखिलेश यादवांवर भाजपाचा पलटवार
अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने प्रत्युत्तर दिले. अखिलेश यादव यांना उत्तर देण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्रीही पुढे आले. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट करत अखिलेश यादव यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तुम्ही ना मुख्यमंत्री बनू शकणार आहात, ना अन्य कुणाला बनवू शकणार आहात. मैनपुरी आणि रामपूरमधील पराभवाचं सावट पाहून तुमचं मानसिक संतुलन ढासळल्याचं दिसतंय. गुंडगिरी, बूथ काबीज करू शकणार नाही. जनतेने सपाची सायकल नाकारली आहे असं त्यांनी सांगितले. तर समाजवादी पक्षाचे लोक स्वप्न पाहत आहेत. मुंगेरीलाल के हसीन सपने पाहिली जात आहेत. विरोधकांकडे एकही मुद्दा शिल्लक नाही, त्यामुळे काहीही वक्तव्ये करत आहेत. पोटनिवडणूक हा ट्रेलर आहे, २०२४ मध्ये आम्ही सर्व जागा जिंकू असा विश्वास उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"