सपा खासदार डिंपल यादवांच्या 'रोड शो'मुळे वाहतूक कोंडी, पोलिसांनी दाखल केला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:16 IST2025-01-31T14:14:29+5:302025-01-31T14:16:03+5:30
डिंपल यादव यांनी गुरुवारी कुमारगंज ते मिल्कीपूर असा रोड शो काढला होता.

सपा खासदार डिंपल यादवांच्या 'रोड शो'मुळे वाहतूक कोंडी, पोलिसांनी दाखल केला गुन्हा
उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांचा गुरुवारी (दि.३०)रोड शो आयोजित करण्यात आला होता. आता या रोड शो प्रकरणी अज्ञात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिंपल यादव यांनी गुरुवारी कुमारगंज ते मिल्कीपूर असा रोड शो काढला होता. याप्रकरणी इनायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक आलोक कुमार सिंह यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल डिंपल यादव यांच्या रोड शोबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोड शो दरम्यान परवानगीपेक्षा जास्त वाहने वापरली गेल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, डिंपल यादव यांच्या रोड शोमुळे रायबरेली महामार्गाच्या दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी झाली होती.
रोड शोचे फोटो सोशल मीडियावर शेअर
डिंपल यादव यांनी मिल्कीपूर पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ केलेल्या रोड शोचा फोटोही आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले आहेत. यामध्ये त्यांच्या रोड शोमध्ये प्रचंड गर्दी आणि वाहनांच्या लांब रांगा दिसून येत आहेत.
मिल्कीपुर विधानसभा में सपा प्रत्याशी श्री अजीत प्रसाद जी के समर्थन में रोड शो। pic.twitter.com/EPGWdfQM2e
— Dimple Yadav (@dimpleyadav) January 30, 2025
मिल्कीपूर विधानसभेची पोटनिवडणूक
मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव गुरुवारी येथे पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मिल्कीपूर मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार अजित प्रसाद उपस्थित होते. तसेच, फैजाबादचे खासदार आणि अजित प्रसाद यांचे वडील अवधेश प्रसाद हे देखील डिंपल यादव यांच्यासोबत रोड शोमध्ये सहभागी झाले होते.
भाजपकडून चंद्रभान यादव यांना उमेदवारी
समाजवादी पक्षाने मिल्कीपूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने मिल्कीपूरमधून चंद्रभान यादव यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच, या पोटनिवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहेत.