Samastipur Family Suicide: बिहारमध्ये 'बुरारी'सारखे प्रकरण, एकाच कुटुंबातील 5 जणांनी घेतला गळफास; मृतांमध्ये दोन मुले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 12:51 PM2022-06-05T12:51:55+5:302022-06-05T12:52:09+5:30
Samastipur Family Suicide:बिहारच्या समस्तीपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढलले आहेत.
समस्तीपूर:बिहारच्या समस्तीपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांनी गळफास लावून आत्महत्या(Samastipur Family Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील बुरारी प्रकरणात ज्याप्रकारे संपूर्ण कुटुंबच फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडले होते, तसाच काहीसा प्रकार समस्तीपूरमध्ये घडला आहे.
हे खळबळजनक प्रकरण विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मढ गावचे आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पाच जणांच्या आत्महत्येच्या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली असून, माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. एफएसएल टीमलाही पाचारण करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कुटुंबातील 5 जणांना फासावर लटकले
मढ गावातील प्रभाग 11 मध्ये राहणारे मनोज झा ऑटो चालवून आणि खैनी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ते वडील रविकांत झा, आई सीता देवी, पत्नी सुंदरमणी देवी आणि दोन मुलांसोबत राहत होते. घराचा गाडा हाकण्यासाठी मनोज यांनी अनेकांकडून कर्ज घेतले होते. कर्जाचा बोजा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण न केल्यामुळे मनोज झा खूप अस्वस्थ असायचे.
मनोज दिलेल्या मुदतीत कर्ज परत करू शकले नव्हते. सातत्याने प्रयत्न करूनही त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी होत नव्हता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यातच पैसे पैसे देणारे सतत त्यांच्या घरी येत असत. अखेर आर्थिक विवंचनेमुळे संपूर्ण कुटुंबानेच हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे.
प्रकरणाचा तपास सुरू
मृतांमध्ये रविकांत झा यांचा मुलगा मनोज झा (45, रा. प्रभाग 11), मनोज झा यांची आईसीता देवी (65), मुलगा सत्यम कुमार (10) आणि शिवम कुमार (07), तसेच, पत्नी सुंदरमणी देवी(38) यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.