गायकवाडांच्या नेतृत्वातील संभाजी ब्रिगेडची होणार बीआरएससोबत युती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 08:26 AM2023-03-04T08:26:56+5:302023-03-04T08:28:24+5:30
येत्या १० मार्चला छत्रपती संभाजीनगर येथे अधिकृत घोषणा
-संजीव जैन
लोकमत न्यूज नेटवर्क
हैदराबाद : संभाजी ब्रिगेडच्या एका फळीने काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाशी युती केल्यानंतर आता पुण्याचे प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वातील दुसऱ्या फळीने तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीशी युतीचा निर्णय घेतला आहे. होळीनंतर १० मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अधिकृतपणे या युतीची घोषणा होईल.
संभाजी ब्रिगेडच्या किसान समितीचे प्रमुख संतोष गव्हाणे, राज्य संघटक प्रदीप कणसे, पुणे शहराध्यक्ष हर्षवर्धन मगदूम, धाराशिव जिल्हा सचिव गौस मुलाणी आदींच्या शिष्टमंडळाने युतीसंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री केसीआर यांची हैदराबाद येथे भेट घेतली. अध्यक्ष प्रवीण गायकवाड व सरचिटणीस सुभाष बोरकर काही कारणांमुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या आमच्या संघटनेच्या नुकत्याच नांदेड येथे झालेल्या बैठकीत राजकारणात सक्रिय होण्याचा आणि सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशभर निर्माण झालेल्या विखारी वातावरणाविरुद्ध लढणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि भारत राष्ट्र समितीची यासंदर्भातील राजकीय ध्येयधोरणे संभाजी ब्रिगेडच्या वैचारिक भूमिकेशी मिळतीजुळती आहेत. दोन्ही राजकीय पक्षांनी त्यामुळे एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका या पदाधिकाऱ्यांनी केसीआर यांच्याशी बोलताना मांडली. त्यानंतर युतीचा निर्णय झाला. येत्या १० तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे भारत राष्ट्र समिती व संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा होईल, असे सांगण्यात आले.