बेळगावात बंदी झुगारून संभाजी महाराज पुतळ्याचे अनावरण, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:49 IST2025-01-06T11:46:42+5:302025-01-06T11:49:34+5:30
गावकरी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचा विरोध

बेळगावात बंदी झुगारून संभाजी महाराज पुतळ्याचे अनावरण, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती
बेळगाव : जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाने पुतळा अनावरण कार्यक्रम लांबणीवर टाकला असला तरी भाजप कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. प्रचंड पोलिस बंदोबस्तात किरकोळ वादावादीचा प्रसंग वगळता हा सोहळा रविवारी शांततेत पार पडला.
अनगोळ छत्रपती संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या महापालिकेने उभारलेल्या पुतळ्याच्या अनावरणावरून गेल्या आठवडाभरापासून वाद सुरू होता. त्यामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलिसप्रमुख याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी शनिवारी रात्री प्रत्यक्ष पाहणी करून पुतळा अनावरण सोहळा लांबणीवर टाकला होता.
तथापि या पुतळ्याच्या अनावरणासाठी आमदार अभय पाटील आणि महापौर सविता कांबळे उपमहापौर आनंद चव्हाण व भाजप नगरसेवक आग्रही होते. आज दिवसभर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संध्याकाळी चार वाजता पुतळा नावावरून होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे दिवसभर प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सायंकाळी महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांनी पुतळास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी महापालिका अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी पुतळ्यासमोरील अडथळे हटवण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ वादावादी झाली. अखेर महापौर सविता कांबळे यांनी स्वतः अडथळे दूर केले.
संध्याकाळी सातच्या सुमारास मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे अनगोळ नाका या ठिकाणी आगमन झाले. तेथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेथून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोलताशे, कलशधारी सुहासिनी आणि भगवे ध्वज घेऊन युवती सहभागी झाल्या होत्या. मोठ्या उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली.
गावकरी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचा विरोध
जिल्हाधिकाऱ्यांनी अनावरण सोहळा लांबणीवर टाकला असतानाही पोलिस बंदोबस्तात अनावरण सोहळा होत असल्यामुळे श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी कुरबर गल्ली कोपऱ्यावर जोरदार घोषणाबाजी करून विरोध केला. उपायुक्त शेकऱ्याप्पा यांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना माघारी धाडले. त्यामुळे किरकोळ वादावादी वगळता पुतळा अनावरण शांततेत झाले.