मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे दिल्लीत, केंद्रीय मागासवर्ग आयोगाची घेणार भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 10:50 AM2023-11-28T10:50:47+5:302023-11-28T10:51:07+5:30
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत.
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आता छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी सरसावले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ आज दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. कायदेशीर प्रक्रिया छत्रपती संभाजीराजे यांना माहिती असल्याने ते विशेष पुढाकार घेताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे मंगळवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत आज दुपारी ३ वाजता केंद्रीय मागासवर्ग अयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ घेणार आहे.
दरम्यान, मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून सतत प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. तसेच, मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी सर्वस्तरावर छत्रपती संभाजीराजे प्रयत्न करत आहे.
याआधी राज्य मागासवर्ग आयोगाची घेतली होती भेट!
१८ नोव्हेंबरला पुण्यात छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. यावेळी मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाचे प्रश्न मांडले. याचबरोबर, त्यावेळी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळविण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईबरोबरच कायदेशीर लढाई सुद्धा लढली पाहिजे, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले होते. या भेटीदरम्यान संभाजीराजे यांच्यासोबत मराठा समाजाचे शिष्टमंडळ सुद्धा होते.