Sambhal Violence: संभलमध्ये सापडली पाकिस्तानी काडतूसं, पोलीस घेणार NIA ची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 09:32 AM2024-12-04T09:32:35+5:302024-12-04T09:37:58+5:30

Sambhal Violence Full Story: जामा मशिदीच्या सर्वेक्षणासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाची टीम आल्यानंतर संभलमध्ये हिंसेची ठिणगी पडली. यात चार जणांचा मृत्यू झाला. आता यात पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे. 

Sambhal Violence: Pakistani cartridges found in Sambhal, police to seek NIA's help | Sambhal Violence: संभलमध्ये सापडली पाकिस्तानी काडतूसं, पोलीस घेणार NIA ची मदत

Sambhal Violence: संभलमध्ये सापडली पाकिस्तानी काडतूसं, पोलीस घेणार NIA ची मदत

Sambhal Violence Updates: उत्तर प्रदेशातील संभलमध्ये झालेल्या हिंसाचारात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे पथक जामा मशि‍दीच्या सर्वेक्षणासाठी आल्यानंतर हिंसाचाराची सुरूवात झाली. यात गोळ्या लागून चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आणि न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाला घटनास्थळी जी काडतूसे आढळून आली, त्यातील काही पाकिस्तानात तयार झालेली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनीच ही माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांकडून एनआयएची मदत घेतली जाणार आहे.

संभलमध्ये २४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. न्याय वैद्यक पथकाने गोळीबार झालेल्या भागातून वापरलेल्या गोळ्यांची काही काडतूसे जप्त केली. या काडतूसांवर POF अर्थात पाकिस्तान ऑर्डिन्स फॅक्टरी असे लिहिलेले आढळून आले. तर दुसऱ्या काडतूसांवर FN STAR लिहिलेलं आहे. 

संभल हिंसाचार: पोलीस अधीक्षकांनी काय सांगितले?

यासंदर्भात बोलताना संभलचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिष्णोई यांनी सांगितले की, या ९ एमएमच्या गोळ्या आहेत. याशिवाय घटनास्थळावरून १२ बोर आणि ३२ बोरचे काडतूसेही जप्त करण्यात आली आहेत. 
 
"फॉरेन्सिक टीमला एक वापरण्यात आलेले काडतूस सापडले. पीओएफ ९ एमएम ६८-२६, एक एफएन स्टार काडतूस  मिळाले, ज्यावर स्ट्राईकर पिनची खूण आहे. एक मेड इन यूएसए १२ एमएम बोरचे काडतूस मिळाले आहे.  यातील एकही बोर पोलिसांचे नाही. सहा फायर करण्यात आलेले काडतूस मिळाले असून, यासंदर्भात तपास सुरू करण्यात आला आहे. आम्ही घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या लोकांना शोधत आहोत", असे पोलीस अधीक्षक बिष्णोई यांनी सांगितले. 

पाकिस्तानी काडतूस सापडल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी इतर केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे. एनआयएची मदतही तपासात घेतली जाईल. संभलमध्ये मागील काही दिवसात अनेकदा एनआयएच्या धाडी पडल्या आहेत, असेही बिष्णोई म्हणाले.

संभलमधून काही संशयित दहशतवाद्यांनाही अटकही केली गेली आहे. संभलमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात असल्याचीही प्रकरणेही आहेत. त्यांचाही तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. दरम्यान, पोलिसांनी या हिंसाचारानंतर संभलमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली असून, १० डिसेंबरपर्यंत बाहेरून येणाऱ्या राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांवर बंदी घातली आहे. 

Web Title: Sambhal Violence: Pakistani cartridges found in Sambhal, police to seek NIA's help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.