संभल हिंसाचाराची होणार चौकशी, सपा खासदार-आमदारांसह 2700 जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 05:16 PM2024-11-25T17:16:07+5:302024-11-25T17:17:22+5:30
या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून, 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 24 पोलीस जखमी झाले आहेत.
UP Sambhal Violence: उत्तर प्रदेशातील संभलमध्ये 24 नोव्हेंबर रोजी जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी सार्थल पोलीस चौकीचे प्रभारी दीपक राठी यांनी सपा खासदार झियाउर रहमान बुर्के आणि आमदार इक्बाल महमूदचा मुलगा सुहेल इक्बालसह 800 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्याच्यावर जमावाला भडकवल्याचा आरोप आहे. दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटनेत उपनिरीक्षक राठी जखमी झाले आहेत.
दरम्यान, मुरादाबादचे आयुक्त अंजनेय सिंह यांनी सोमवारी सांगितले की, संभल हिंसाचाराची दंडाधिकारी चौकशी केली जाईल. ज्या भागात हिंसाचार झाला, तो भाग वगळता अन्य भागात दुकाने सुरू असून परिस्थिती सामान्य आहे. ज्या प्रकारचे पुरावे मिळत आहेत, ते पाहता दंगलखोरांवर कडक कारवाई केली जाईल आणि एनएसएदेखील लावला जाईल.
याप्रकरणी आतापर्यंत एकूण 7 एफआयआर दाखल करण्यात आले असून, त्यापैकी संभळ पोलीस ठाण्यात 5 तर नखासा पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी झालेल्या हिंसाचारात उपनिरीक्षक शाह फैसल यांचे पिस्तूल चोरट्यांच्या जमावाने लुटले होते. त्यांच्या वतीने 6 ओळखीच्या आणि 200 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एसडीएम रमेश बाबू यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्यांच्यावतीने 800 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभलचे सीओ अनुज चौधरी यांच्या पायाला गोळी लागली
पाहणी पथकातील सीओ अनुज चौधरी यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात सीओ अनुज चौधरी यांच्या पायाला गोळी लागली. यामुळे त्यांनीदेखील 700 ते 800 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एकता चौकीचे प्रभारी संजीव कुमार यांनीदेखील बंदुकीच्या गोळ्या/मॅगझीन लुटल्याप्रकरणी आणि अश्रुधुराचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्याकडून 150 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
अनेकांना अटक
संभल कोतवाली येथील 22 आणि नखासा पोलीस ठाण्यातील 3 अशा एकूण 25 जणांना अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या फुटेजचा अभ्यास करून आरोपींची छायाचित्रे काढली जात आहेत. संभल हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत एकूण 2750 अज्ञात आणि काही नावाजलेल्या लोकांविरुद्ध 7 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 24 पोलीस जखमी झाले आहेत.