मोदीजी देश के बाप है! असं म्हणणा-या भाजपा प्रवक्त्याला मिळालं 'कडक' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 05:26 PM2017-12-11T17:26:20+5:302017-12-11T17:58:41+5:30
भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी न्यूज 18 इंडिया चॅनलच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना देश का बाप असं म्हटलं
मुंबई: भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी न्यूज 18 इंडिया चॅनलच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना देश का बाप असं म्हटलं आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याच्यासोबत झालेल्या एका डिबेट शोमध्ये बोलताना संबित पात्रा यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी नरेंद्र मोदी हे ‘देश के बाप है, सब के बाप है’ असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर कन्हैया कुमार चांगलाच संतापला, आणि ते तुमचे बाप असतील पण देशाचे बाप नाहीयेत, बोलताना शब्द जपून वापरा अशा शब्दांमध्ये त्यांना सुनावलं. आजपर्यंत मोदी-मोदी करूनच तुम्ही राजकीय वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यामुळेच ओएनजीसीचे डायरेक्टर तुम्ही झाला आहात, आता काय मंत्री व्हायचंय का? अशा शब्दांमध्ये कन्हैयाने संबित पात्रांवर थेट हल्लाबोल केला. या कार्यक्रमात नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी ही दोन्ही नावं एकत्र छेडून कन्हैयाने संबित पात्रा यांची कोंडी केली होती. गोडसेला मानतात की गांधींना मानतात या प्रश्नावर कन्हैयाने संबित पात्रांची गोची केल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.
संबित पात्रा यांनी मोदींना देश का बाप संबोधून राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान केल्याचं कॉंग्रेसने म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी संबित पात्रा यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.
अजूनपर्यंत कोणीही राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अशाप्रकारे अपमान केलेला नाही. याच भाजपाने मध्य प्रदेशमध्ये नथुराम गोडसेचं मंदिर उभारलं आहे, गोडसे महापुरूष होते असं भाजपाच्या मंत्र्याने म्हटलं होतं, अशा शब्दांमध्ये भाजपावर टीका करत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागावी आणि संबित पात्रांना पक्षातून निलंबित करावं अशी मागणी केली आहे. ज्या प्रकारे आम्ही मणिशंकर अय्यर यांना निलंबित केलं तसंच मोदी पात्रा यांना बाहेरचा रस्ता दाखवतील का ? मोदींनी असं पाऊल उचलल्यास कॉंग्रेस त्याचं स्वागत करेल असं सुरजेवाला यावेळी म्हणाले.