पंतप्रधानांनाही नियम सारखाच, नरेंद्र मोदींनी गुडघे टेकून मागितली माफी, नेमका काय प्रकार, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 10:49 AM2022-10-01T10:49:20+5:302022-10-01T10:50:52+5:30
Narendra Modi: राजकारणी, मंत्री आणि अन्य व्हीआयपी मंडळींसाठी नियमांमध्ये अनेकदा शिथिलता आणली जाते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नियम हे पंतप्रधानांसाठी सारखेच असल्याचे आपल्या एका कृतीतून दाखवून दिले.
जयपूर - आपल्याकडे लागू करण्यात आलेले अनेक नियम मोडण्याकडे अनेकांचा सर्रासपणे कल दिसून येतो. त्यात राजकारणी, मंत्री आणि अन्य व्हीआयपी मंडळींसाठी नियमांमध्ये अनेकदा शिथिलता आणली जाते. मात्र पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नियम हे पंतप्रधानांसाठी सारखेच असल्याचे आपल्या एका कृतीतून दाखवून दिले.
त्याचे झाले असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी राजल्थानमध्ये एका सभेसाठी जाणार होते. मात्र पंतप्रधान मोदी सभेच्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. मोदी जेव्हा सभेसाठी पोहोचले तेव्हा रात्रीचे १० वाजले होते. मात्र तरीही सभास्थानी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. मात्र तेव्हा मोदींनी नियमांचं पालन करत व्यासपीठावरून माईकवरून भाषण केलं नाही. तसेच आपल्याला झालेल्या उशिरामुळे पंतप्रधानांनी गुडघे टेकून वाट पाहत असलेल्या लोकांची माफी मागितली.
सभास्थळी उशिराने पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना आवाहन करताना म्हणाले की, मला येथे पोहोचायला उशीर झाला आहे. आता १० वाजले आहेत. माझा अंतरात्मा सांगतो की, मी कायदे-नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मात्र मी पुन्हा येथे येईन आणि तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलं आहे त्याची व्याजासह भरपाई करीन, असं आश्वासन मोदींनी उपस्थितांना दिलं.
या घटनेचा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्ऱधान नरेंद्र मोदी भारत माता की जय अशा घोषणा देत असल्याचे दिसत आहे. तसेच ते गुडघ्यावर बसून हात जोडून उपस्थितांची माफी मागत मंचावर नतमस्तक होऊन माफी मागत असल्याचे दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री १० नंतर माईकवरून संबोधित न करण्याच्या नियमाचं पालन केलं. या कृतीमधून मोदींनी नियम आणि कायद्यांपेक्षा कुणीही मोठा नसल्याचा संदेश दिला आहे. आपण स्वत: पंतप्रधान असूनही नियम तोडत नसल्याचे मोदींनी दाखवून दिले आहे.