एकाच वेळी 36 वार, अशी आहे एस-400 ची विध्वंसक मारक क्षमता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 12:47 PM2018-10-05T12:47:27+5:302018-10-05T12:48:07+5:30
भारत आणि रशियामध्ये एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या खरेदी व्यवहाराबाबत करार होणार आहे. अत्यंत मारक क्षमता असलेली ही मिसाईल डिफेन्स सिस्टिम एकाच वेळी 36 वार करण्यास सक्षम आहे.
नवी दिल्ली - भारत आणि रशियामध्ये एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या खरेदी व्यवहाराबाबत करार होणार आहे. अत्यंत मारक क्षमता असलेली ही मिसाईल डिफेन्स सिस्टिम एकाच वेळी 36 वार करण्यास सक्षम आहे. त्यामुळे या प्रणालीला जगातील सर्वात अत्याधुनिक मिसाइल डिफेन्स सिस्टीम मानले जाते.
भारत या मिसाइल डिफेन्स सिस्टीमच्या पाच रेजिमेंट्सची खरेदी करणार आहे. त्यासाठी सुमारे 5 अब्ज डॉलर म्हणजेच 40 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. भारत आणि रशियामध्ये होणारा हा करार भारताच्या सर्वात मोठ्या खरेदी करारांपैकी एक ठरणार आहे.
काय आहे एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली ?
एस-400 ही जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून, या प्रणालीमध्ये शत्रूची विमानांना अचूकरीत्या लक्ष्य करण्याचं सामर्थ्य आहे. एस-400 ला रशियाची अत्याधुनिक लांब पल्ल्याती जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल डिफेन्स सिस्टीम मानले जाते. ही प्रणाली शत्रूची क्रूझ, विमाने आणि बॅलेस्टिक मिसाईल टिपण्यात सक्षम आहे. ही प्रणाली रशियाच्याच एस-300 प्रणालीचे आधुनिक रुप आहे.
अल्माज आंटे या शास्त्रज्ञाने ही प्रणाली विकसित केली होती. तसेच 2007 पासून एस 400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम रशियाच्या सेवेत आहे. एकाच वेळी 36 वार करण्याची क्षमता हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि रशियामध्ये शस्त्रास्त्र करार होत असून, भारत रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्र खरेदी करत असतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या अमेरिकेबरोबर टू प्लस टू बैठकीत एस-400च्या खरेदी व्यवहाराला परवानगी मिळावी, यासाठी भारत प्रयत्नशील होता. परंतु अमेरिकेनं त्याला अजून अधिकृतरीत्या परवानगी दिलेली नाही.
मात्र भारत या करारासाठी ठाम आहे. कारण लढाऊ विमानांच्या कमतरतेमुळे भारताची संरक्षण क्षमता कमी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवरी एस-400 करार भारतासाठी बुस्टर डोसचे काम करेल, असे हवाई दल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी म्हटले होते.