पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस रोखली, तणावाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 01:02 PM2019-02-28T13:02:20+5:302019-02-28T13:04:39+5:30
गुरुवारी समझोता एक्स्प्रेसला पाकिस्तानने अटारीजवळ थांबविली आहे.
नवी दिल्ली : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने गेल्या मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. यानंतर संतापलेल्या पाकिस्तानेभारताविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने दोन्ही देशांदरम्यान धावणारी समझौता एक्स्प्रेस रोखली आहे.
समझौता एक्स्प्रेस दर सोमवारी आणि गुरुवारी पाकिस्तानमधून भारतात रवाना होते. मात्र, आज गुरुवारी समझोता एक्स्प्रेसला पाकिस्तानने अटारीजवळ थांबविली आहे. तसेच, अनिश्चित कालावधीपर्यंत समझौता एक्स्प्रेसची सेवा बंद राहील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केल्याचे वृत्त पाकिस्तानमधील काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. दरम्यान, या समझौता एक्स्प्रेसमध्ये जवळपास 27 प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या कारावाईनंतर बिथरलेल्या पाकिस्ताने भारताविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दोन्ही देशात तवाणाचे वातावरण आहे.