‘सॅमसंग नोट-२’ने घेतला पेट
By admin | Published: September 24, 2016 06:13 AM2016-09-24T06:13:06+5:302016-09-24T06:13:31+5:30
इंडिगो विमानात ‘सॅमसंग नोट-२’ स्मार्टफोन आगीने पेटल्याने विमानातील १७५ प्रवाशांत एकच घबराट निर्माण झाली.
नवी दिल्ली : चेन्नई विमानतळावर उतरण्याच्या बेतात असलेल्या इंडिगो विमानात ‘सॅमसंग नोट-२’ स्मार्टफोन आगीने पेटल्याने विमानातील १७५ प्रवाशांत एकच घबराट निर्माण झाली. सिंगापूर-चेन्नई या हवाईमार्गावरील इंडिगोच्या (६-ई-०५४) विमानात शुक्रवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. चालक पथकाने शिताफीने धूर निघत असलेल्या जागी धाव घेत अग्निरोधक उपकरणाच्या साह्याने आग विझविली. त्यानंतर हे विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले. सुदैवाने विमान आणि प्रवाशांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचले नाही.
दोन आठवड्यांपूर्वी सॅमसंग नोट-७ या स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या परदेशांतील घटनांची दखल घेत विमानात हा फोन नेण्यास नागरी उड्डयन महासंचानालयाने (डीजीसीए) बंदी घातली आहे. अवघ्या १५ दिवसांत सॅमसंग स्मार्टफोनच्या बाबतीत घडलेल्या या घटनांमुळे सॅमसंग कंपनी अडचणीत आली आहे. विमानात सॅमसंगच्या स्मार्टफोनने पेट घेण्याची भारतातील ही पहिलीच घटना असली तरी सॅमसंग कंपनीकडून याबाबत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
विमानात प्रवासी आसनाच्या वर प्रवासी सामान ठेवण्याच्या जागेत ठेवण्यात आलेल्या बॅगमध्ये हा फोन होता. सिंगापूरहून निघालेले इंडिगोचे हे विमान चेन्नई विमानतळावर उतरण्याच्या तयारी असताना विमानातील काही प्रवाशांना धुराचा वास येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच विमानचालक पथकाला हा प्रकार कळवला. विमानचालक पथकाने शिताफीने विमानातील त्या आसनाकडे (सीट-२३-सी) धाव घेत अग्निशमन उपकरणाच्या साह्याने बॅग विझविली. दरम्यान, विमानातील चालक पथकाने वैमानिकाला हा प्रकार कळविला. वैमानिकाने तातडीने या प्रकाराबाबत हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला संदेश देत सतर्क केले.
>डीजीसीए पुन्हा जारी करणार नव्याने निर्देश
इंडिगो या विमानसेवा कंपनीने सांगितले की, विमान सहीसलामत उतरविण्यात आले. तसेच सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आता सॅमसंगच्या या मोबाईलची संबंधित विभागाकडून तपासणी केली जाईल. तथापि, या घटनेच्या पार्श्वभूमीवर डीजीसीए सॅमसंगच्या या मोबाईलबाबत नव्याने सल्लात्मक निर्देश जारी करील. डीजीसीएने विमान प्रवाशांना यापूर्वीच विमानात असताना सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ मोबाईल फोन बंद करण्याचा सल्ला दिलेला आहे.
>सामान ठेवण्याच्या कप्प्यातील बॅगेत होता हा फोन...
विमान आकाशात असताना हा प्रकार घडल्याने प्रवाशांत घबराट पसरली होती. त्यामुळे विमानचालक पथकाने सर्वतोपरी खबरदारी घेत स्थिती हाताळल्याने अनर्थ टळला. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बॅगेतील ‘सॅमसंग नोट-२’मधून
धूर निघत होता. अग्निरोधक उपकरणाचा वापर करून धुमसणारा धूर विझविला. नंतर हा स्मार्टफोन विमानातील प्रसाधनगृहातील पाण्याच्या डब्यात ठेवला.विमानचालक पथकाने नेमका धूर कोठून निघत आहे, याचा शोध घेतला. तेव्हा ‘सीट-२३-सी’वरील ओव्हरहेड बिनमधून (आसनावरील प्रवासी सामान ठेवण्याचा कप्पा) धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.