‘सनातन धर्म’ वाद सुप्रीम कोर्टात; २६० मान्यवरांचे सरन्यायाधीशांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 11:51 AM2023-09-06T11:51:11+5:302023-09-06T11:51:17+5:30
दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एसएन धिंग्रा यांचाही या मान्यवरांमध्ये समावेश आहे.
नवी दिल्ली : माजी न्यायाधीश आणि नोकरशहांसह २६० हून अधिक मान्यवरांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून ‘सनातन धर्म’ नष्ट करण्याविषयी द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेण्याची विनंती केली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एसएन धिंग्रा यांचाही या मान्यवरांमध्ये समावेश आहे.
या पत्रात म्हटले आहे की, उदयनिधी स्टॅलिन यांनी केवळ द्वेषपूर्ण भाषणच दिले नाही, तर त्यांनी आपल्या टिप्पणीबद्दल माफी मागण्यासही नकार दिला. हे पत्र १४ निवृत्त न्यायाधीश आणि १३० माजी नोकरशहा तसेच सशस्त्र दलातील ११८ माजी अधिकाऱ्यांसह २६२ जणांनी लिहिले आहे. स्टॅलिन यांनी केलेल्या टिप्पण्यांमुळे चिंतेत आहोत आणि या टिप्पण्या निर्विवादपणे भारतीय लोकसंख्येच्या मोठ्या वर्गाविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण आहे आणि त्यातून भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन होते, ज्यामध्ये भारताची कल्पना धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून केली जाते. देशाचे धर्मनिरपेक्ष चारित्र्य जपण्यासाठी कृती करण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेले भाष्य केवळ लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे, असे पलानीस्वामी यांनी म्हटले आहे.
थट्टाच केली म्हणाना
अत्यंत गंभीर मुद्द्यांवर कारवाई करण्यात प्रशासनाकडून विलंब झाल्यास न्यायालयाचा अवमान होईल, राज्य सरकारने कारवाई करण्यास नकार देऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे आणि कायद्याच्या राज्याचा अवमान केला आहे किंवा त्याची थट्टाच केली असे म्हणाना,” असे पत्रात म्हटले आहे.