सनातन धर्मावर वादग्रस्त टीका करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना सुप्रीम कोर्टने फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 02:56 PM2024-03-04T14:56:15+5:302024-03-04T14:59:06+5:30
Sanatan Dharma Remarks: उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन हिंदू धर्माची तुलना डेंग्यू-मलिरियाशी केली.
Supreme Court Hearing: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन हिंदू धर्माबाबत अतिशय खालच्या स्तराचे वक्तव्य केले होते. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. त्यांच्या या वक्तव्याबद्दल आता सुप्रीम कोर्टाने उदयनिधी यांना कडक शब्दांत फटकारले. स्टॅलिन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, असे कोर्टाने म्हटले.
स्टॅलिन यांना न्यायालयाचा झटका
सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात अनेक राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. ही सर्व प्रकरणे एकत्र करण्याची मागणी करत उदयनिधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्याला न्यायालयाकडून दिलासा मिळेल, असे त्यांना वाटले, पण उलट न्यायालयाने त्यांनाच कडक शब्दात फटकारले.
"You are not a layman; you are a minister": Supreme Court questions DMK's Udhayanidhi Stalin over remarks on 'Sanatana'
— ANI Digital (@ani_digital) March 4, 2024
Read @ANI Story | https://t.co/hW35xGtB3V#UdhayanidhiStalin#DMK#SupremeCourt#SantanaDharmaremarkpic.twitter.com/nDeBtWuA2f
विविध राज्यात गुन्हे दाखल
सोमवारी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या खंडपीठासमोर सनातन उदयनिधी यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात स्टॅलिन यांची बाजू मांडताना म्हटले की, बंगळुरू, उत्तर प्रदेश, बिहार आणि जम्मूमध्ये खटले दाखल झाले आहेत, ते एकत्र विलीन केले पाहिजेत.
'अधिकाराचा गैरवापर केला...'
यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या खंडपीठाने म्हटले की, तुम्ही कलम 19 (1) ए आणि 25 अंतर्गत तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला आणि आता तुम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दिलासा मागत आहात. तुम्ही सामान्य माणूस नाही, राजकारणी आहात. अशा वक्तव्यांचा परिणाम काय होईल, याचा विचार तुम्ही आधीच करायला हवा होता. सध्या न्यायालयाने पुढील आठवड्यापर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे.