"राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नव्हते, कारण त्या...", उदयनिधी स्टॅलिन यांचे पुन्हा सनातन धर्मावर वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 08:50 AM2023-09-21T08:50:43+5:302023-09-21T08:55:24+5:30

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावरुन उदयनिधी स्टॅलिन केंद्रातील मोदी सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. 

sanatan row dmk leader udhaynidhi stalin said president droupadi murmu not invited in new parliament as she is widow | "राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नव्हते, कारण त्या...", उदयनिधी स्टॅलिन यांचे पुन्हा सनातन धर्मावर वक्तव्य 

"राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नव्हते, कारण त्या...", उदयनिधी स्टॅलिन यांचे पुन्हा सनातन धर्मावर वक्तव्य 

googlenewsNext

सनातन धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आलेले तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नाव घेऊन सनातन धर्मावर टीका केली आहे. तसेच, संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावरुन उदयनिधी स्टॅलिन केंद्रातील मोदी सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. 

बुधवारी (२० सप्टेंबर) आपल्या पक्षाच्या एका कार्यक्रमात संबोधित करताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले नाही, कारण त्या आदिवासी समाजाचे आहेत आणि विधवा आहेत. हाच सनातन धर्म आहे का? असा सवाल करत उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनच्या विरोधात आवाज उठवत राहू, असेही यावेळी भाष्य केले. 

जवळपास ८०० कोटी रुपये खर्च करून बांधलेले नवीन संसद भवन हा एक महत्त्वाचा प्रकल्प होता. संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी (भाजप) उद्घाटनासाठी तामिळनाडूतील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रित केले होते, परंतु भारताच्या राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले नाही. तसेच, आता विशेष अधिवेशनासाठीही त्यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही, असेही उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. 

याशिवाय, उदयनिधी स्टॅलिन यांनी निदर्शनास आणून दिले की, संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडले, तेव्हाही हिंदी अभिनेत्रींना आमंत्रित करण्यात आले होते, मग देशाच्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना का आमंत्रित करण्यात आलेले नाही? राष्ट्रपतींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही कारणांमुळे बाहेर ठेवण्यात आले होते. या घटना म्हणजे अशा निर्णयांवर 'सनातन धर्मा'चा प्रभाव असल्याचे द्योतकच, असा दावाही उदयनिधी स्टॅलिन यांनी केला आहे.

याचबरोबर, सनातनबद्दलच्या आपल्या आधीच्या वक्तव्यावर ठाम राहून उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, "लोकांनी माझ्या डोक्यावर बक्षीस ठेवले आहे, परंतु मी या सर्व गोष्टींना घाबरत नाही. सनातनला संपवण्यासाठी द्रमुकची स्थापना करण्यात आली आणि आम्ही आमचे ध्येय साध्य करेपर्यंत आम्ही थांबणार नाही."

याआधी काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?
उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) चेन्नई येथे बोलताना सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते की, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. जसे की, डासांमुळे डेंग्यू, कोरोना आणि मलेरियासारखे आजार होतात. त्यांचा आपण विरोध करू शकत नाही, त्यांचा नायनाट करावा लागतो. सनातन धर्मही तसाच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
 

Web Title: sanatan row dmk leader udhaynidhi stalin said president droupadi murmu not invited in new parliament as she is widow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.