वाळू माफियांनी पोलिसांना चिरडले, मंत्री म्हणाले, यात काय विशेष? अशा घटना घडतच असतात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 05:34 PM2023-11-14T17:34:32+5:302023-11-14T17:34:59+5:30
Bihar News: बिहारमधील जमुई येथे वाळूमाफियांनी पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टर अंगावर काढून चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. मात्र या घटनेनंतर बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी धक्कादायक विधान केलं आहे.
बिहारमधील जमुई येथे वाळूमाफियांनी पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टर अंगावर काढून चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. मात्र या घटनेनंतर बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी धक्कादायक विधान केलं आहे. अशा घटना होतच राहतात, असं बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. त्यानंतर खासदार चिराग पासवान यांनी नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मंगळवारी सकाळी एका वाळू माफियाने रस्त्यावर तपासणी करत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना चिरडले. त्यात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, या घटनेबाबत बिहारच्या शिक्षणमंत्र्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अशा घटना घडतच राहतात, ही काही नवी गोष्ट नाही आहे.
याआधीही अनेकदा इतर राज्यांमध्येही अशा घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये अशा घटना घडल्या आहेत. हा गुन्हा आहेस कायद्यानुसार आरोपींना शिक्षा दिली जाईल. गुन्हेगार अस्तित्वात आहेत त्यामुळे अशा घटना घडतात. अशा अपराध्यांना प्रत्युत्तरही दिलं जातं. त्यांना पकडून तुरुंगात टाकलं जातं. मृत पोलीस अधिकारी हे केवळ बिहारचेच नाही तर संपूर्ण देशाचे सुपुत्र आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून चिराग पासवान यांनी नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रीजी राज्यात वाळू तस्करांचं तांडव सुरू आहे. अशा परिस्थितीत तुमच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे सर्व तुमच्या संरक्षणात होत आहे का, नसेल तर काही कठोर पावलं का उचलली जात नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला आहे.