संदीप दास यांना ग्रॅमी पुरस्कार
By admin | Published: February 14, 2017 12:40 AM2017-02-14T00:40:32+5:302017-02-14T00:40:32+5:30
सांस्कृतिक आणि संगीत क्षेत्रात समृद्ध असलेल्या देशातून मी आलो आहे. माझ्या देशाच्या रक्तातच संगीत वाहत असून मला
लॉस एंजिलिस : सांस्कृतिक आणि संगीत क्षेत्रात समृद्ध असलेल्या देशातून मी आलो आहे. माझ्या देशाच्या रक्तातच संगीत वाहत असून मला तेथून खूप शुभेच्छा मिळाल्या आहेत, अशी भावना जागतिक संगीत गटामध्ये प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार पटकावणारे तबलापटू संदीप दास यांनी व्यक्त केली.
यो-यो मा यांच्या ‘सिंग मी होम’ कार्यक्रमाचा भाग असलेले भारतीय तबलापटू संदीप दास रविवारी रात्री प्रतिष्ठेच्या ग्रॅमी पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलत होते.
जागतिक संगीत गटात अनुष्का शंकर यांच्या ‘लँड आॅफ गोल्ड’चाही समावेश होता. परंतु त्यांना पुरस्कारापासून वंचित राहावे लागण्याची ही सहावी वेळ होती.
अनुष्का शंकर यांच्या ‘लँड आॅफ गोल्ड’चा विषय जागतिक पातळीवरील निर्वासितांच्या प्रश्नाशी संबंधित आहे. अनुष्का शंकर या प्रसिद्ध सितारवादक पंडित रवि शंकर यांच्या कन्या असून त्यांना वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. परंतु त्यांना अजूनही या सन्मानाने हुलकावणी दिली आहे.
बियोन्सने चाहत्यांना आपल्या अत्यंत प्रभावी कामगिरीने दीपवून टाकले असले तरी २०१७ वर्षाच्या महत्वाच्या ग्रॅमी अवॉर्डसची मानकरी ठरली ती ब्रिटिश गायक अॅडले. ‘अल्बम आॅफ द ईयर’, ‘रेकॉर्ड आॅफ द ईयर’ आणि ‘साँग आॅफ द ईयर’सह पाचही वर्गांत अॅडले या पुरस्कारांची मानकरी ठरली.
उत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट पॉप व्होकल अल्बमसह पाचही वर्गांसाठी अॅडलेचे नामांकन झाले होते. या पुरस्कारांच्या स्पर्धेत बियोन्स ‘लिमोनेड’साठी नऊ नामांकनासह खूप आघाडीवर होती परंतु तिला केवळ दोनच पुरस्कारावर समाधान मानावे लागले.
ग्रॅमीमध्ये १९९९ पासून प्रथमच बेस्ट न्यू आर्टिस्टचा पुरस्कार चान्स द रॅपर (चॅन्सेलर जोनाथन बेनेट) या २३ वर्षांच्या कृष्णवर्णीयाने पटकावला. ‘कलरिंग बुक’ या त्याच्या तिसऱ्या मिक्सटेपसाठी त्याने हा पुरस्कार मिळवला. (वृत्तसंस्था)
पुरस्काराचे दोन तुकडे केले अॅडलेने
अॅडलेने तिला अल्बम आॅफ द ईयरसाठी मिळालेल्या गॅ्रमी पुरस्काराचे व्यासपीठावरच दोन तुकडे केले व हा पुरस्कार खऱ्या अर्थाने बियोन्सचा असल्याचे म्हटले.
बियोन्सचा ‘लिमोनेड’ हा या पुरस्काराचा मानकरी ठरायला हवा होता, अशा शब्दांत अॅडलेने आपल्या भावना पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात व्यक्त केल्या.