धर्मांतरावर संघ ठाम!

By admin | Published: December 21, 2014 02:39 AM2014-12-21T02:39:10+5:302014-12-21T02:39:10+5:30

‘घर वापसी’ कार्यक्रमांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी येथे समर्थन केले आणि धर्मांतर व्हायला नको असेल तर धर्मांतरबंदी कायदा करावा, असे आग्रही प्रतिपादन केले.

Sangam firm on conversion! | धर्मांतरावर संघ ठाम!

धर्मांतरावर संघ ठाम!

Next

‘घर वापसी’ सुरूच ठेवू : भागवत म्हणतात... पसंत नसेल तर कायदा करा
कोलकाता : सक्तीने धर्मांतर केले गेलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी संघ परिवाराशी संबंधित संस्थांकडून सुरू असलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी येथे समर्थन केले आणि धर्मांतर व्हायला नको असेल तर धर्मांतरबंदी कायदा करावा, असे आग्रही प्रतिपादन केले.
येथील शहीद मिनार मैदानावर भरलेल्या, पश्चिम बंगालमधील अशा प्रकारच्या पहिल्याच, ‘विशाल हिंदू संमेलना’त बोलताना भागवत म्हणाले की, धर्मांतर करून हिंदू करून घेणे कोणाला आवडत नसेल तर हिंदूंचेही धर्मांतर होता कामा नये.
भागवत म्हणाले, ‘आम्ही सशक्त हिंदू समाज घडवीत आहोत. जे (वाट चुकून) हिंदू धर्मातून बाहेर गेले आहेत ते स्वत:हून गेलेले नाहीत. प्रलोभने दाखवून व सक्तीने त्यांना नेण्यात आले आहे. त्यांना परत यायचे असेल तर आम्ही त्यांना नक्कीच परत आणू. गेलेले लोक आमचेच आहेत. चोराने चोरलेली आमची मौल्यवान वस्तू, चोराला पकडल्यावर, आम्ही त्याच्याकडून परत घेत आहोत. यात नवीन असे काहीच नाही.
उत्तर भारतात काही हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांवरून गेला आठवडाभर संसदेत आणि संसदेबाहेर वादळ उठलेले असताना सरसंघचालकांनी या विषयावर प्रथमच जाहीर वक्तव्य केले.
टीकाकारांना उद्देशून ते म्हणाले, ‘हे कोणाला आवडत नसेल तर धर्मांतरावर संपूर्ण बंदी घालणारा कायदा करावा. पण तुम्हाला असा कायदा नको आहे. धर्मांतर करून हिंदू होणे तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही हिंदूंचे धर्मांतरही करू नका. ही आमची ठाम भूमिका आहे. (वृत्तसंस्था)

अमित शहांना हवा धर्मांतरबंदी कायदा
कोची : धर्मांतराच्या मुद्द्यावर संसदेत विरोधकांनी चालवलेली कोंडी आणि त्यामुळे सरकारची मलीन होत असलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवर, बळजबरीच्या धर्मांतरास भाजपाचा पूर्णपणे विरोध असल्याची स्पष्टोक्ती पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी दिली़ देशात धर्मांतरविरोधी कायद्याची गरज अधोरेखित करतानाच, या कायद्यास स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले़ 

भागवत उवाच...
हिंदूंना उद्देशून भागवत यांचे असे म्हणणे होते की, (तुम्ही) घाबरण्याचे काहीच कारण नाही. आपण आपल्याच देशात राहत आहोत. आपण काही घुसखोर नाही. हा आपला देश आहे, आपले ‘हिंदू राष्ट्र’ आहे. हिंदू आपली (स्वत:ची) भूमी सोडून जाणार नाहीत. भूतकाळात आपण जे गमावले ते आपण परत मिळवू. हिंदूंमधील जागरणाने कोणीही भीती बाळगण्याची गरज नाही. याविरुद्ध ओरड करणारे स्वार्थी आहेत व अशी ओरड करण्यात त्यांचे निहित हित गुंतलेले आहे.

कोणावरही जुलूम-जबरदस्ती करण्यावर हिंदूंचा अजिबात विश्वास नाही, असे प्रतिपादन करून भागवत म्हणाले की, बांगलादेश किंवा पाकिस्तानने अत्याचार केले तरी हिंदू निमूटपणे सहन करतात. १०० पापांचा घडा भरला की मग अत्याचारांचा प्र्रतिकार करा, असे हिंदूंचा परमेश्वर सांगतो.

मोदी सरकारच्या विकासाचे ‘धर्मांतर’
भाजपाने विकासाच्या नावावर निवडणुका जिंकल्या होत्या़ ‘अच्छे दिन आयेंगे’ असे आश्वासन देशाच्या जनतेला दिले होते़ मात्र निवडणूक जिंकल्यानंतर भाजपाप्रणीत रालोआ सरकार गत सहा महिन्यांत ‘लव जिहाद’ आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलत आहे, अशी टीका आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केली़

जे (वाट चुकून) हिंदू धर्मातून बाहेर गेले आहेत ते स्वत:हून गेलेले नाहीत. त्यांना परत यायचे असेल तर आम्ही त्यांना नक्कीच परत आणू. - मोहन भागवत

 

Web Title: Sangam firm on conversion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.