संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर

By admin | Published: June 14, 2015 01:55 AM2015-06-14T01:55:19+5:302015-06-14T01:55:19+5:30

ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि संगीतकार तुळशीदास बोरकर यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आहे.

Sangeet Natak Academy Award announcer | संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर

संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर

Next

नवी दिल्ली : ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि संगीतकार तुळशीदास बोरकर यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आहे. याशिवाय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, औरंगाबादचे पं. नाथ नेरळकर, संगीत रंगभूमीवरील गायक व अभिनेते रामदास कामत आणि सुप्रसिद्ध बासरीवादक रोणु मुजुमदार यांच्यासह ३६ जणांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.
बोरकर यांच्यासह संगीततज्ज्ञ एस.आर. जानकीरामन, चित्रपट निर्माते एम.एस. सत्यु आणि शास्त्रीय गायक विजय किचलु यांचीही २०१४च्या फेलोशिपसाठी निवड करण्यात आली असून, त्यांना ३ लाख रुपये रोख देऊन गौरविण्यात येईल. संगीत अकादमीतर्फे संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल फेलोशिप आणि पुरस्कार दिले जातात. कार्यकारी समितीने बुधवारी हा निर्णय घेतला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अकादमीचे विविध क्षेत्रांसाठी जाहीर केलेले पुरस्कार
संगीत : अश्विनी भिडे-देशपांडे (गायिका), उस्ताद इक्बाल अहमद खान, नाथ नेरळकर, पंडित नयन घोष, रोणु मुजुमदार (बासरीवादन), सुकन्या रामगोपाल, द्वारम दुर्गा, प्रसाद राव.
नृत्यकला : अदयार जनार्दनन् (भरतनाट्यम), उमा डोग्रा (कथ्थक), अमुसनादेवी, वेदान्तम् राधेश्याम (कुचीपुडी), सुधाकर साहु (ओडिसी), अनिता शर्मा, जग्रु महतो, नवतेजसिंग जोहर
नाटक : रामदास कामत, अमोद भट, असगर वजाहत, चिदंबरराव जांबे, देवशंकर हलदार, मंजुनाथ भागवत होस्टोटा, अमरदास माणिकपुरी
अश्विनी भिडे - देशपांडे : संगीत नाटक अकादमीच्या या राष्ट्रीय पुरस्काराला वैभवशाली परंपरा आहे. आतापर्यंत अनेक नामवंत कलावंतांना हा पुरस्कार मिळालेला आहे. या वेळी हा पुरस्कार मला मिळाल्यामुळे ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आल्यासारखे वाटते.
रोणू मुजुमदार : संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार म्हणजे माझ्या गेल्या ४0 वर्षांच्या संगीतसेवेची पावती आहे. यासाठी मी माझे गुरुवर्य, तसेच माझ्या हितचिंतकांना धन्यवाद देऊ इच्छितो. कारण या सर्वांमुळेच मी आज या स्तरावर येऊन पोहोचलो आहे. संगीत क्षेत्रातला हा मोठा पुरस्कार आहे आणि तो मला मिळाल्याबद्दल मला समाधान आहे. माझे आतापर्यंतचे काम योग्य दिशेने झाले आहे, यावर या पुरस्काराने मोहोर उमटवली आहे.
रामदास कामत : संगीत नाटक अकादमीचा हा पुरस्कार मानाचा आहे आणि हा पुरस्कार मला मिळाल्याबद्दल अतिशय आनंद वाटला. हा सन्मान केवळ माझा नाही; तर हा सन्मान नाट्यसंगीताचा आहे. त्याचबरोबर सुगम संगीताचाही हा गौरव आहे. त्यामुळे मला विशेष आनंद आहे. हा पुरस्कार मिळाला याचा मला अभिमान वाटतो.

Web Title: Sangeet Natak Academy Award announcer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.