संघ आणि भाजप देशातील संस्था ताब्यात घेत आहेत!, संयुक्त किसान मोर्चातर्फे संविधान बचाओ दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 06:00 AM2021-04-15T06:00:37+5:302021-04-15T06:01:50+5:30
Dr. Darshan Pal : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असलेल्या शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संविधान बचाओ दिन कार्यक्रमात पाल बोलत होते.
- विकास झाडे
नवी दिल्ली : मोदी सरकार हे अर्थव्यवस्था आणि समाजासाठी धोकादायक असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपसाठी पूरक आहे. ते देशातील महत्त्वाच्या संस्था संघाच्या ताब्यात घेत असल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाचे नेते डॉ. दर्शन पाल यांनी केला.
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असलेल्या शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संविधान बचाओ दिन कार्यक्रमात पाल बोलत होते. पाल म्हणाले, “शेतकरी आणि कामगार वर्गाचे वसाहतवादी राजवटीत खूप शोषण झाले. हीच व्यवस्था बदलण्यासाठी राज्यघटना ही सामाजिक क्रांती म्हणून तयार करण्यात आली होती. राज्यघटनेत समानता, न्याय आणि प्रगतीची तरतूद आहे, ज्यावर सरकारे सतत हल्ला करीत आहेत. सध्याचे सरकार सुधारणांच्या नावाखाली घटनेत फेरफार करीत आहे. राज्यातील विषय असलेल्या शेतीबाबत कायदा करणे हे केंद्र सरकारसाठी निश्चितच घटनाबाह्य पाऊल आहे. त्याचबरोबर भाजप व आरएसएसने विविध संस्था ताब्यात घेणे हे भारताच्या भवितव्यासाठी धोक्याचे आहे.”
हरियाणाच्या दलित संघटनांनी टिकरीच्या सीमेवर जाऊन शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला.