संघाने भाजपाला दिला घरचा अहेर
By admin | Published: February 18, 2015 01:25 AM2015-02-18T01:25:04+5:302015-02-18T01:25:04+5:30
भारतीय जनता पक्ष (भाजप) दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरला नसतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षावर शरसंधान साधले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक : किरण बेदी यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (भाजप) दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरला नसतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षावर शरसंधान साधले आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याच्या निर्णयावर संघाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय पक्ष कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्याची भाजपला कशी किंमत मोजावी लागली याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे.
संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यच्या ताज्या अंकात ‘आकांक्षाओंकी उडान’ आणि ‘वादे, सवाल, केजरीवाल’ या शीर्षकाखाली दोन लेख प्रकाशित झाले आहेत. या लेखांमधून दिल्लीत भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली आहे. अखेर भाजप पराभूत का झाला? बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याचा निर्णय योग्य होता काय? या पदासाठी हर्षवर्धन अथवा राज्यातील इतर कुठल्या नेत्याची निवड केली असती तर निकालाचे चित्र वेगळे असते काय? आदी प्रश्न यात उपस्थित करण्यात आले आहेत.
मनोज वर्मा यांनी लिहिलेल्या लेखात पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी जनतेसमक्ष मांडण्यात अपयशी ठरला की मोदी लाटेवर अवाजवी अवलंबून राहिला, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
यात बेदींची उमेदवारी कशी महागात पडली याकडे लक्ष वेधतानाच असे नमूद करण्यात आले की, संघटनेत ऐक्य, नियोजनाचा अभाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार झाला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्हितेश शंकर यांनी लिहिलेल्या दुसऱ्या लेखात भाजपच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडे संघ सिद्धांतांची शिदोरी आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या समर्पणाशिवाय दुसरे कुठले भांडवल आहे याचे उत्तर द्यावे लागणार आहे.
च्पक्ष म्हणजे एखाद्या यंत्राप्रमाणे असून ते आपल्या इच्छेनुसार त्याचा कारभार चालवू शकतात, असे संघटना आणि सरकारमधील काही लोकांना वाटू लागले असेल तर या निकालांनी त्यांचा हा भ्रमाचा भोपळा फुटला पाहिजे.
च्कारण केवळ पक्ष कार्यकर्त्यांचे समर्पण आणि राष्ट्रवादी सिद्धांताप्रती असलेली वचनबद्धता याच्या बळावरच भाजप आपली मते कायम ठेवू शकला आहे, अशा कठोर शब्दांत या लेखात पक्ष नेतृत्वाची कानउघाडणी करण्यात आली आहे.