ओवेसींचा हैदराबादी किल्ला भेदणार सानिया? बडा पक्ष निवडणूक मैदानात उतरवण्याच्या तयारीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 04:10 PM2024-03-28T16:10:35+5:302024-03-28T16:11:34+5:30
खरे तर, काँग्रेसने हैदराबादमध्ये 1980 मध्ये शेवटची निवडणूक जिंकली होती. तेव्हा एस नारायण हे काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते.
भारताची दिग्गज टेनिस स्टार सानिया मिर्झा लोकसभा निवडणूक 2024 च्या माध्यमाने राजकारणात एन्ट्री करू शकते. या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात हैदराबादमधून सानियाला उमेदवारी देण्याच्या विचार असल्याचे समजते.
मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (सीईसी) बुधवारी झालेल्या बैठकीत सानिया मिर्झाच्या नावावरही चर्चा झाली. या बैठकीत काँग्रेसने गोवा, दमण, दीव, तेलंगणा, यूपी आणि झारखंडसाठी 18 उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली होती. यावेळी सानिया मिर्झालाही निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यावर चर्चा झाली.
हैदराबाद शहरातील आपली सैल झालेली पकड सानिया मिर्झाच्या लोकप्रियतेचा फायदा घेत पुन्हा एकदा मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, असे संबंधित वत्तात म्हणण्यात आले आहे. खरे तर, काँग्रेसने हैदराबादमध्ये 1980 मध्ये शेवटची निवडणूक जिंकली होती. तेव्हा एस नारायण हे काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. वृत्तानुसार, आता उमेदवारीसाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि आताचे काँग्रेस नेते मोहम्मद अझहरुद्दीन यांनी सानिया मिर्झाचे नाव सुचवले होते. या दोन्ही खेळाडूंमध्ये कौटुंबिक संबंध आहेत. 2019 मध्ये अझहरुद्दीन यांचा मुलगा मोहम्मद असदुद्दीन याचे लग्न सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्जा सोबत झाले आहे.
हैदराबादच्या जागेसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून एआयएमआयएम कडेच आहे. हा त्यांचा गड मानला जातो. मात्र, 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ओवेसी यांच्या पक्षाला चांगली टक्कर दिली होती. 1984 मध्ये, सुल्तान सलाहुद्दीन ओवेसी यांनी एक स्वतंत्र उमेदवार म्हणून येथून विजय मिळवला होता. यानंतर त्यांनी 1989 ते 1999 पर्यंत AIMIM चा उमेदवार म्हणून हैदराबादमधून विजय मिळवला होता. त्यांच्यानंतर, असदुद्दीन ओवेसी यांचा 2004 पासून या जागेवर कब्जा आहे. 2019 मध्ये, 14 उमेदवारांनी ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. या निवडणुकीत ओवेसी यांना एकूण 58.94% मतं मिळाली होती. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे, बीआरएसने गद्दाम श्रीनिवास यादव यांना मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसने आपल्या उमेदवाराची घोषणा अद्याप केलेली नाही.