संजद, रालोद, जेव्हीएम यांचे विलीनीकरण शक्य
By admin | Published: March 21, 2016 02:42 AM2016-03-21T02:42:37+5:302016-03-21T02:42:37+5:30
जनता परिवाराला एकत्र आणण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता संयुक्त जनता दल, राष्ट्रीय लोकदल, झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) आणि समाजवादी जनता पार्टी या पक्षांचे बिहार
नवी दिल्ली : जनता परिवाराला एकत्र आणण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता संयुक्त जनता दल, राष्ट्रीय लोकदल, झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) आणि समाजवादी जनता पार्टी या पक्षांचे बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, संजदचे अध्यक्ष शरद यादव, रालोदचे अध्यक्ष अजितसिंग, त्यांचे पुत्र जयंत चौधरी आणि निवडणूक विषयक डावपेच आखणारे प्रशांत किशोर यांनी गेल्या १५ मार्च रोजी संजदचे सरचिटणीस के. सी. त्यागी यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक घेतली.
या बैठकीत वरील सर्व पक्षांना एकत्र आणण्याच्या संदर्भात विचारविमर्श करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नितीशकुमार यांनी जेव्हीएम (पी) चे नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांच्याशी या मुद्यावर थेट बोलणीही केलेली आहे. मरांडी यांनी भाजपपासून वेगळे झाल्यानंतर जेव्हीएम (पी) स्थापन केला होता. अजितसिंग आणि त्यागी यांनी या विलीनीकरणाबाबत समाजवादी जनता पार्टीचे अध्यक्ष कमल मोरारका यांच्यासोबत अनेकदा चर्चा केलेली आहे. ‘या चारही पक्षांचे लवकरच विलीनीकरण होऊ शकते. याबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. विलीनीकरणाची तारीख अद्याप ठरलेली नाही; परंतु नवा पक्ष याच महिन्याअखेरपर्यंत अस्तित्वात येऊ शकतो,’ असे या सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)