महाराष्ट्रात राजकारण तापवणारे संजय राऊत, नवनीत राणा लडाख दौऱ्यावर; चकित झालात?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 10:35 AM2022-05-19T10:35:28+5:302022-05-19T10:41:17+5:30

महाराष्ट्रात हनुमान चालीसावरुन एकमेकांसमोर उभे ठाकलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राणा दाम्पत्य सध्या लेह-लडाख दौऱ्यावर आहेत.

Sanjay Raut and Navneet Rana on Ladakh tour Are you surprised here is the reason behind it | महाराष्ट्रात राजकारण तापवणारे संजय राऊत, नवनीत राणा लडाख दौऱ्यावर; चकित झालात?

महाराष्ट्रात राजकारण तापवणारे संजय राऊत, नवनीत राणा लडाख दौऱ्यावर; चकित झालात?

Next

नवी दिल्ली-

महाराष्ट्रात हनुमान चालीसावरुन एकमेकांसमोर उभे ठाकलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राणा दाम्पत्य सध्या लेह-लडाख दौऱ्यावर आहेत. गेल्या चार दिवसांपासून संजय राऊत, नवनीत राणा यांच्यासह एकूण ३० खासदार संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून लडाख दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या निमित्तानं दोघंही एकमेकांसमोर येणार का? आणि दोघांमध्ये काही चर्चा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

परराष्ट्र व्यवहार समितीचा दौरा गेल्या चार दिवसांपासून लेह आणि लडाखमध्ये सुरू आहे. यात खासदाराला आपल्यासोबत कुटुंबातील एका सदस्याला घेऊन येण्याचीही मूभा असते. त्यामुळे नवनीत राणा यांच्यासह आमदार रवी राणा देखील आहे. देशातील एकूण ३० खासदारांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील फक्त तीन खासदार असून यात संजय राऊत, नवनीत राणा आणि प्रकाश जावडेकर यांचा समावेश आहे. काश्मीरच्या खंडगार वातावरणात खासदार फिरत आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यात कितीही हवेदावे किंवा राजकीय वैर असलं तरी अशा कार्यक्रमांमध्ये राजकीय वैर बाजूला सारून संवाद साधण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. त्यामुळे राजकीय वैर बाजूला ठेवून संजय राऊत आणि राणा दाम्पत्य यांच्यात चर्चा होणार का हे पाहावं लागेल. 

संजय राऊतांनी वेळोवेळी चीनच्या घुसखोरीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य करत आले आहेत. त्यात काल या अभ्यास दौऱ्यात खासदारांनी वादग्रस्त पेंगॉंग लेकला भेट देऊन पाहणी केली. संजय राऊत यांनी लेह-लडाख दौऱ्यावेळी उंच पर्वतरांगांचा एक फोटो ट्विट करत लेह-लडाख हा एक अपूर्व संगम आहे...जय महाराष्ट्र! असं म्हटलं होतं. 

लडाखमधून महाराष्ट्रावर 'नजर'
संजय राऊत गेल्या चार दिवसांपासून लडाखमध्ये असले तरी त्याचं महाराष्ट्राच्या राजकारणावरही बारीक लक्ष आहे. ट्विटच्या माध्यमातून ते आपली भूमिका मांडत आहेत. राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठीवरुन चढाओढ सुरू असताना राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेचीच असल्याचं एक ट्विट काल संजय राऊत यांनी केलं होतं. शिवसेनेनं सहाव्या जागेसाठी दावा ठोकला आहे. तर संभाजी राजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं याआधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे निवडणूक आता चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर काल संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधत राज्यात आता सहाव्या जागेसाठी घोडेबाजार विरोधकांकडून सुरू केला जाईल असा हल्लाबोल केला होता. "महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय. भ्रष्टाचारातून पैसा त्यातून घोडेबाजार हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणीही कितीही आकडेमोड करावी. आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे", असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. 

Web Title: Sanjay Raut and Navneet Rana on Ladakh tour Are you surprised here is the reason behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.