“राज्यात भाडोत्री सैन्यच राज्य करतंय”; संजय राऊतांकडून शिंदे गटाची वॅग्नर लष्कराशी तुलना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 01:41 PM2023-06-25T13:41:19+5:302023-06-25T13:48:30+5:30
Sanjay Raut News: औरंगाजेबाची कबर उखडून टाकू, असे हेच फडणवीस-शिंदे म्हणाले होते. आम्ही जेसीबी घेऊन देतो, उखडून टाका, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.
Sanjay Raut News: गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या तीन दिवसांनंतर उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस या दोन बड्या नेत्यांमध्ये शवासनावरून शनिवारी वाक्युद्ध रंगले. यातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाची तुलना थेट रशियातील वॅग्नर लष्कराशी करत, महाराष्ट्रात भाडोत्री सैन्यच राज्य करत आहे, अशी घणाघाती टीका केली.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यकर्ते ज्या पद्धतीने काम करत आहे, ही हुकूमशाही आणि दहशतवादाच्या पुढील पायरी आहे. पुतिन हा हुकूमशाह आहे. पुतिनने वॅग्नर हे भाडोत्री सैन्य नेमले होते. जेव्हा भाडोत्री सैन्यावर राज्य करण्याची वेळ येते, तेव्हा ते उलटले जाते. महाराष्ट्रात भाडोत्री सैन्यच राज्य करत आहे. हे भाडोत्री सैन्यच तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही, अशी सडकून टीका संजय राऊत यांनी केली. तसेच वॅग्नर लष्कराप्रमाणे शिंदेंचे भाडोत्री सैन्य भाजपावर उलटणार आहे. हे कोणाचे नसतात, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
आम्ही जेसीबी घेऊन देतो, उखडून टाका
प्रकाश आंबेडकरांनी औरंगाजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतले, त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, असे विचारले असता, प्रकाश आंबेडकरांशी आमची युती झाली नाही. आम्ही यावर बोललो आहे. पण, फडणवीस यावर बोलू शकले नाहीत. अन्य लोक कबरीवर गेल्यावर फडणवीसांनी किती मोठा फणा काढला होता. आता हा फणा वेटोळे घालून बसला आहे का? अशी विचारणा करत, हेच फडणवीस आणि शिंदे औरंगाजेबाची कबर उखडून टाकू म्हणाले होते. आम्ही जेसीबी घेऊन देतो, उखडून टाका, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.
दरम्यान, स्वार्थासाठी पाटण्यात लोक एकत्र आली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. यावर बोलताना, हे परमार्थासाठी एकत्र आलेत का? हा त्यांचा अध्यात्म आणि परमार्थ असेल, तर सांगा. परमार्थाची व्याख्या वारकऱ्यांकडून समजून घ्यावी लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.