"...तर मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार"; PM मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 11:06 AM2024-10-21T11:06:07+5:302024-10-21T11:13:31+5:30

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut criticized CJI Chandrachud statement on the Ram Janmabhoomi case | "...तर मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार"; PM मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचे विधान

"...तर मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार"; PM मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचे विधान

Sanjay Raut on CJI DY Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी नुकताच अयोध्या-बाबरी मशीद वाद प्रकरणात निकाल देण्याआधीचा किस्सा सांगितला आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले. सरन्यायाधीशांनी केलेल्या विधानाची देशभरात चर्चा होच आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाच्या प्रलंबित खटल्यावरुन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर टीका केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हे विष्णुचे चौदावे अवतार असू शकतात असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली होती, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.  तुमची आस्था असेल तर देव तुम्हाला मार्ग शोधून देतात, देवाने मलाही मार्ग दाखवला, असेही सरन्यायाधीश म्हणाले. सरन्यायाधीश चंद्रचूड पुण्याच्या खेड तालुक्यातील कण्हेरसर या त्यांच्या मूळ गावी एका सभेत बोलत होते. सरन्यायाधीशांच्या विधानावरुन खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय हे महत्त्वाचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं.

"म्हणून नरेंद्र मोदींना सरन्यायाधीशांना गणपतीच्या आरतीसाठी बोलवलं होतं. ते संविधानावर विसंबून नसून, कायद्याचे पुस्तक त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसून त्यांना जे साक्षात्कार होतात त्यावर अवलंबून ते निर्णय घेतात की काय असं लोकांच्या मनात येऊ शकतं. ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय. शिवसेनेला न्याय देऊ नका अशी ईश्वराची इच्छा नक्कीच नसणार. ही इच्छा विष्णुच्या तेराव्या अवताराची असेल आणि या तेराव्या अवताराने सरन्यायाधीशांना काही साक्षात्कार दिला असेल. म्हणून आमचा निकाल विधानसभेची मुदत संपल्यावरही लागणार नसेल तर नक्कीच मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार आहे. कारण ते विष्णुचे चौदावे अवतार असू शकतात," असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

काय म्हणाले सरन्यायाधीश?

"न्यायालयात काम करत असताना अशी प्रकरणं समोर येतात जी सोडवणं कठीण असतं. अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना माझी अशीच काहीशी स्थिती झाली होती. अयोध्या खटल्यात तीन महिने आम्ही त्यावरील सुनावणी करत होतो. शेकडो वर्षे जो वाद कोणी सोडवू शकलं नव्हतं, तेच प्रकरण आमच्या पुढे आलं होतं. त्यावेळी यातून मार्ग कसा शोधायचा? असा प्रश्न आम्हाला पडला होता. मी या खटल्याचा निकाल देण्यापूर्वी देवाची पूजा करताना देवाकडेच मदत मागितली. मी दररोज सकाळी देवाची पूजा करतो तशीच पूजा त्या दिवशी देखील करत होतो. मी भगवंतापुढे बसलो आणि भगवंताला म्हणालो, आता तुम्हीच मला मार्ग शोधून द्या. तुमचा यावर विश्वास असेल, तुमची आस्था असेल तर देव तुम्हाला मार्ग शोधून देतात, देवाने मलाही मार्ग दाखवला,” असं सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

Web Title: Sanjay Raut criticized CJI Chandrachud statement on the Ram Janmabhoomi case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.