अडवाणी, जोशींना जो ७५ वर्षांचा नियम लागू केला, त्याच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का?; संजय राऊत यांचा फडणवीसांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:14 IST2025-04-01T10:07:21+5:302025-04-01T11:14:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

अडवाणी, जोशींना जो ७५ वर्षांचा नियम लागू केला, त्याच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का?; संजय राऊत यांचा फडणवीसांना सवाल
Sanjay Raut on PM Modi Retirement: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपुरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती स्थळाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली. या कार्यक्रमावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीचा मुद्दा छेडला आहे. नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये पंतप्रधानपदावरून निवृत्त होणार आहेत असं विधान संजय राऊत यांनी केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्यानंतर महत्त्वाच्या पदावर कोण बसणार अशी चर्चा सुरु झाली. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडील हयात असताना वारसदाराची चर्चा होत नाही, असं म्हटलं. यावर आता लालकृष्ण अडवाणींचा उल्लेख करत संजय राऊतांनी पलटवार केला आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक नियम केला आहे. त्यांच्या पक्षात ७५ वर्षे झाल्यानंतर सत्तेच्या पदावर कुणी राहू नये हा त्यांचा नियम आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना तो नियम लागू केला. या नियमाच्या पलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती. त्यासाठीच ते चर्चा करण्यासाठी गेले होते. १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. त्यांना कितीही बोलू द्या," असं संजय राऊत म्हणाले.
"मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की बाप जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही. कोण बाप? या देशाला बाप नाही. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत आणि ही तात्पुरती व्यवस्था असते. राम आणि कृष्ण सुद्धा त्यांचे अवतार कार्य संपल्यावर ते निघून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अवतार कार्य संपलेले आहे त्यांना निघून जावं लागेल. लालकृष्ण अडवणी जिवंत असताना शाहजहाँप्रमाणे त्यांना कोंडून ठेवलं, बेदखल केलं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेच ना. भाजपचा डोलारा अडवाणी यांनी उभा केला. त्यांचा पंतप्रधान पदाचा हक्क असताना मुघलीसत्ते प्रमाणे त्यांना बेदखल केलं आणि हे स्वतः पंतप्रधान झाले. तेव्हा आम्ही विचारलं होतं का?," असा सवाल संजय राऊत यांनी केला.
"अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना ट्रोल का केलं जातंय याच्याविषयी मला बोलायचं नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होणार आहेत आणि त्या विषयी चर्चा करण्यासाठी त्यांना बोलवलं होतं. आरएसएस ही भाजपची मातृसंस्था आहे. त्यामुळे आई बाप ठरवतील. आरएसएसचे भाजपमध्ये काय महत्त्व आहे हे मी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगायचे असेल तर ते नकली आरएसएसचे स्वंयसेवक आहेत," असंही संजय राऊत म्हणाले.