Sanjay Raut: शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरुन खाली खेचण्याचा भाजपचाच गेम, राऊतांनी आरोपांची 'क्रोनोलॉजी'च सांगितली!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 04:36 PM2022-12-22T16:36:31+5:302022-12-22T16:38:44+5:30
लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
नवी दिल्ली-
लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याचे पडसाद आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले. शेवाळेंच्या आरोपांवर संजय राऊत आक्रमक झाले असून पत्रकार परिषद घेत शिंदे सरकार आणि भाजपावर घणाघात केला आहे. आदित्य ठाकरेंवर आरोप करण्याचा मूळात राहुल शेवाळे यांना अधिकारच नाही, असं संजय राऊत म्हणाले. तसंच कारण नसताना आदित्य ठाकरेंचा विषय काढून तरुण नेत्याला बदनाम करण्याचं पाप केलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे कारनामे केले जात आहेत, असंही राऊत म्हणाले.
सभागृहात गोंधळ पण कार्यालयात एकत्र! ठाकरे-शिंदे गटाच्या खासदारांचा Video समोर
राऊत यांनी यावेळी पुन्हा एकदा नागपूर न्यास भूखंड घोटाळ्याची माहिती देत शिंदेंवर निशाणा साधला तसंच या आरोपांमागे भाजपाच्या आमदारांचा हात असल्याचं सांगितलं. ज्या भूखंडावरुन तत्कालीन नगरविकास मंत्र्यांवर आरोप केले जात आहेत तो मुद्दा खरंतर याआधी भाजपाच्याच आमदारांनी तारांकित प्रश्न म्हणून उपस्थित केला होता. यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण लटके यांचा समावेश होता. त्यामुळे भाजपाच्याच आमदारांनी उपस्थित केलेला तारांकित प्रश्न आम्ही यावेळी लावून धरला आहे, असं राऊत म्हणाले.
खासदार राहुल शेवाळेंच्या SIT चौकशीचे आदेश, उपसभापती निलम गोऱ्हेंची घोषणा
"चंद्रशेखर बावनकुळे यांनीच याआधी नागपूर न्यास भूखंडाचा प्रश्न तारांकित प्रश्न म्हणून सभागृहात उपस्थित केला होता. इतकंच नव्हे, तर नुकतंच एका कार्यक्रमात बावनकुळे यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत जोवर आपण प्रदेशाध्यक्ष आहोत तोवर फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचं विधान केलं. त्याच्या दोनच दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांविरोधातील हे प्रकरण पुढे आलं आहे. त्यामुळे खोके सरकारनं भाजपाचं राजकारण समजून घ्यावं", असं संजय राऊत म्हणाले.
शिंदे सरकार पडणार हे निश्चित
नागपूर न्यास भूखंड घोटाळा इतका गंभीर आहे की यात १०० कोटींपर्यंतचा गैरव्यवहार आहे आणि त्यावर आम्ही नव्हे तर न्यायालयानंच प्रश्न उपस्थित केले आहेत. लिहून देतो शिंदे सरकार फेब्रुवारी महिला पाहणार नाही. त्याआधीच हे सरकार कोसळेल, असंही संजय राऊत म्हणाले.
तुमच्या फाइल बाहेर निघाल्या तर...
भूखंड घोटाळ्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांना बदनाम केलं जात असल्याचा घणाघात करत संजय राऊत यांनी शिंदे गटातील नेत्यांना सूचक इशारा दिला. "तुम्ही आमच्या फाइल बाहेर काढत आहात. पण आम्ही लढत राहू. एक गोष्ट लक्षात ठेवा आम्हाला तुमच्या घरातल्या फाइल बाहेर काढायला लावू नका. त्या जर बाहेर निघाल्या तर त्या सेंट्रल हॉलपर्यंत जातील. शिंदे गटात सामील झालेल्यांच्या सर्व फाइल कशा बंद झाल्या? भ्रष्टाचारावर बोलणारे किरीट सोमय्या आज कुठे गेलेत? त्यांना मुख्यमंत्र्यांचा घोटाळा आज दिसत नाहीय का?", अशा प्रश्नांची सरबत्तीच राऊत यांनी यावेळी केली.