Sanjay Raut : "ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 11:01 AM2024-06-08T11:01:32+5:302024-06-08T11:07:55+5:30
Sanjay Raut And BJP : संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआय या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे.
राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील वरळी येथील सीजे हाऊसमधील १८० कोटी रुपये किंमतीच्या सदनिकांची जप्ती मनी लाँडरिंग प्रकरणे हाताळणाऱ्या सफेमा लवादाने रद्द केली. रविवारी होऊ घातलेल्या रालोआ सरकारच्या शपथविधीपूर्वी पटेल यांना दिलासा मिळाला. यावरून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआय या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे.
"ईडीने प्रफुल्ल पटेल यांना दिलासा दिलेला नाही तर भाजपाने दिलासा दिलेला आहे. ईडी असो, सीबीआय असो... भाजपाने, मोदीजी, अमित शाह यांनी त्यांना दिलासा दिला आहे. आरएसएस, विश्वहिंदू परिषद, बजरंग दल, ABVP, वनवासी संघटना... याप्रमाणेच ईडी, सीबीआय या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या फाईल बंद होतात, अशोक चव्हाण, शिंदे यांच्या फाईल्स बंद होतात" असं म्हणत संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे.
"हे सरकार टिकणार नाही"
"सरकार स्थापनेपासून घोटाळा सुरू आणि मोदी देशस्थापनेच्या गप्पा मारत आहेत. तिसरी टर्म देशसेवेसाठी... तिसरी टर्म कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी... हे आता स्पष्ट झालं आहे. अजुनही नरेंद्र मोदी बेरोजगारी, महागाई, चीनची घुसखोरी असे अनेक प्रश्न आहेत त्यावर बोलले नाहीत. अमित शाह आणि नरेंद्र मोदी शेअर बाजारावर बोलत आहेत. हे सरकार टिकणार नाही"
"संविधान बदलणार ही भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारलं आहे. त्यानंतर संविधानाची प्रत ही मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली त्याबद्दल आभार मानतो. हे सरकार टिकणार नाही हे त्यांनाही माहिती आहे म्हणूनच जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा. उद्योगपतींचा फायदा करून घ्यायचा आणि लाखो कोटींचा देशाला चुना लावायचा... हे यांचं धोरण दिसत आहे."
"विधानसभेला याचा वचपा काढला जाईल"
"महाविकास आघाडीला महाराष्ट्रात यश मिळालं आहे. ३० जागांचं यश हे मोठं यश आहे. किमान सात ते आठ जागा या जोर जबरदस्ती, पैशाची दहशत, प्रशासनावर दबाव, चोऱ्यामाऱ्या, लबाडी.... अमोल किर्तीकर यांचं उदाहरण... अशा प्रकारे मिळवल्या. विधानसभेला याचा वचपा काढला जाईल" असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.