लडाखमध्ये शेपूट... चीनच्या घुसकोरीवर 'बुलडोझर' कधी? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 11:25 AM2022-06-14T11:25:34+5:302022-06-14T11:26:29+5:30

रांची, कानपूर, प्रयागराज आदी ठिकाणी हिंसाचार घडला. रांची येथे दोघांचे बळी गेले.

Sanjay Raut: Tail in Ladakh ... When is the bulldozer on Chinese infiltration? Shiv Sena questions Modi government | लडाखमध्ये शेपूट... चीनच्या घुसकोरीवर 'बुलडोझर' कधी? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

लडाखमध्ये शेपूट... चीनच्या घुसकोरीवर 'बुलडोझर' कधी? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

Next

नवी दिल्ली - प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे देशात तापलेले वातावरण शांत होण्याचे नाव घेईना. आखाती देशांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व दिल्लीतील नेते नवीनकुमार जिंदल यांच्या विधानांवर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर दोघांवर कारवाई झाली. दोघांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर गेल्या शुक्रवारी साप्ताहिक प्रार्थनेनंतर देशात जागोजागी अल्पसंख्याक समाज निषेधासाठी रस्त्यावर आला. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनांमधील आरोपींवर कारवाई करण्यासाठी चक्क त्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. यावरुन, शिवसेनेनं योगी सरकार आणि मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून केंद्र सरकारला चीनच्या घुसकोरीची आठवणच शिवसेननं करुन दिली आहे. 

रांची, कानपूर, प्रयागराज आदी ठिकाणी हिंसाचार घडला. रांची येथे दोघांचे बळी गेले. पोलिसांवर ठरवून गोळीबाराचा आरोप झाला. याप्रकरणातील आरोप मोहम्मद जावेदच्या घरावर बुलडोझर फिरवून त्याचे घर जमीनदोस्त करण्यात आले. सरकारच्या या कारवाईनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. 

चीननेलडाखमध्ये तैनात केलेली जेट विमाने 25 मिनिटांत दिल्लीच्या दिशेने झेपावतील तरी आपले नवे बादशहा सांगतील, ‘‘दिल्ली अभी दूर है।’’ किंवा चीनने बेकायदा बांधकाम केले म्हणून रागाने चांदनी चौकात किंवा जामा मशीद परिसरात बुलडोझर पाठवतील. देशाला राष्ट्रभक्तीचे धडे देणाऱ्यांच्या दिव्याखाली आणि बुडाखाली हा असा अंधारच अंधार आहे, अशा शब्दात शिवसेनेनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच,  राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या विजयाने अकलेचे दिवे पाजळले हे खरे, पण कश्मीरातील हिंदूंच्या रक्ताचे पाट त्यामुळे थांबणार नाहीत व लडाखमध्ये घुसलेला चीनही मागे हटणार नाही ही वस्तुस्थिती आहे. चीनने लडाखच्या हद्दीत एअरबेस बनवला हे समजूनही जे लोक फक्त घडामोडींवर नजर ठेवून आहेत, त्यांच्या नजरेत बेफिकिरीचा मस्तवाल वडसच वाढल्याचे शिवसेनेनं अग्रलेखातून म्हटलं आहे.

चीनचा मास्टरस्ट्रोक खुपत का नाही

राज्यसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष भारतीय जनता पक्ष राज्याराज्यांत करीत आहे. महाराष्ट्रात राज्यसभेची सहावी जागा काय जिंकली, भाजपने तर ‘बॅण्डबाजा’ लावून विजयी मिरवणुकाच काढल्या. एक राज्यसभा जिंकल्याचा उत्सव जे लोक साजरा करीत आहेत, त्यांना देशावर फडफडणाऱ्या संकटाविषयी काही कल्पना आहे काय? पूर्व लडाख सीमेवर चीनने एक एअरबेस निर्माण केला आहे. तेथे त्यांनी ‘जे-20’ आणि ‘जे-11’सारखी फायटर जेट लढाऊ विमाने तैनात केली आहेत, पण याविषयी मोदी सरकारच्या चेहऱ्यावर एखादी तरी चिंतेची रेषा आज उमटलेली दिसते काय? हा एअरबेस लडाखच्या हद्दीत बनत आहे. म्हणजे चीनने केलेले हे आक्रमण आहे. सहाव्या जागेचा विजयोत्सव साजरा करून ‘मास्टरस्ट्रोक’ मारणाऱ्या चाणक्य मंडळास चीनचा हा ‘मास्टरस्ट्रोक’ खुपू नये याचे आश्चर्य वाटते. 

लडाखमध्ये कधी फिरणार बुलडोझर

लडाखमधील चीनच्या हालचालींवर म्हणे आम्ही बारीक नजर ठेवून आहोत. अहो साहेब, तुमची ती बारीक नजर चुकवून चीन आधी गॅलवान व्हॅलीत घुसला व तेथील तीन हजार वर्ग मीटर जमिनीचा ताबा करीत रस्त्यावर उतरला. कानपूर, दिल्ली, प्रयाग राजसारख्या शहरांत त्यावरून दंगे उसळले. ते सर्व दंगलखोर मुसलमान होते. त्यांच्यावर हजारोंच्या संख्येने गुन्हे दाखल करून अटका झाल्या व त्या दंगलखोरांच्या घरादारांवर, दुकानांवर लगेच बुलडोझर फिरवून सूड घेण्यात आला. हेच बुलडोझर लडाखच्या हद्दीत चीनने जे बेकायदेशीर रस्ते, पूल, इमारती उभ्या केल्या, त्यावर कधी फिरणार? चीनने लडाखमध्ये जे बांधकाम मोठय़ा प्रमाणावर केले आहे त्यावर ज्या दिवशी हे राष्ट्रीय स्वाभिमानाचे बुलडोझर फिरवले जातील, तेव्हाच आजचे राज्यकर्ते ‘मास्टरस्ट्रोक’ मारणारे हिंमतबाज आहेत हे सिद्ध होईल. दुबळय़ांना चिरडायचे व शक्तिमान लाल चिन्यांपुढे नरमाईने वागायचे यास काय म्हणायचे? एकंदरीत आपल्या अंतर्गत व राष्ट्रीय सुरक्षेचा हा असा खेळखंडोबाच सुरू आहे. 

Web Title: Sanjay Raut: Tail in Ladakh ... When is the bulldozer on Chinese infiltration? Shiv Sena questions Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.