"... पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 07:35 AM2022-01-02T07:35:17+5:302022-01-02T07:35:39+5:30

संजय राऊतांचा पंतप्रधानांवर 'रोखठोक' निशाणा.

sanjay raut targeted pm narenra modi over new Mercedes Benz car make in india saamna editorial | "... पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये"

"... पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये"

Next

"2021 साल सरले, पण 2022 या वर्षात आशेची किरणे दिसतील काय? महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी 12 कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी आता खरेदी केली. त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहे," असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

"28 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या 12 कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले, तेच परदेशी बनवटीच्या गाड्या वापरतात," असं म्हणत राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून पंतप्रधानांवर टीकेचा बाण सोडला आहे.

काय म्हटलंय राऊत यांनी?
"2021 अनेक जळमटे तशीच ठेवून सरले आहे. तेच निर्बंध, तेच सर्व प्रश्न 2022 च्या झोळीत टाकून 2021 सरले तेव्हा लोकांनी फार मोठा जल्लोष केला असे चित्र दिसले नाही. 2020 मावळताना 2021 वर्षाला गोंधळ व अराजकाची भेट दिली. 2021 ने 2022 ला तोच नजराणा पुढे दिला. मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात. म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही. तो कायम आहे," असे ते म्हणाले.

'म्हणून कार महत्त्वाची'
"पंडित नेहरू यांनी सदैव हिंदुस्थानी बनावटीची अॅम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वांत जास्त धोका होता. महात्मा गांधी तर बेडरपणे भ्याड खुनी हल्ल्यास सामोरे गेले. जिवास प्रचंड धोका असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. तामीळनाडूच्या गर्दीत राजीव गांधी गेले व लिट्टेकडून मारले गेले. हे त्यांचे साहस होय. त्यांनी असे साहस करायला नकोच होते, पण केले. पंतप्रधान मोदींची 12 कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे," असंही ते म्हणाले.

'तो भ्रम आहे'
'मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला आता असे वाटू लागले की, त्यांचा पक्ष सत्तेवरून कधीच खाली उतरणार नाही. तो भ्रम आहे. प. बंगालात भाजपचा दारुण पराभव झाला. नरेंद्र मोदी यांचा चेहरा व अमित शहा यांची दबंग चाणक्य नीती सर्वत्र चालतेच असे नाही हे प. बंगालने सिद्ध केले. कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीतही काल भाजपचा पराभव झाला. भाजपास दहा जागाही कोलकाता म्युनिसिपालिटीत जिंकता आल्या नाहीत. या निवडणुकीत भाजपची 20 टक्के मते कमी झाली. चंदिगड महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपचा टक्का घसरला. तेथे ‘आप’सारख्या पक्षाने बाजी मारली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यात नव्या वर्षात विधानसभेच्या निवडणुका आहेत. तेथेही भाजपची घसरगुंडीच होईल असे स्पष्ट दिसते. 2014 साली सुरू झालेल्या भाजपच्या प्रवासाचा आलेख 2022 मध्ये खाली आलेला दिसेल, इतका रोष जनतेच्या मनात आहे," असंही राऊत यांनी नमूद केलंय.

'खापर फोडून मोकळे'
"पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असे खापर फोडून मोदी व सरकार 12 कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झाले आहेत. मोदी यांचे वृत्तवाहिन्यांवरील रोजचे ‘दर्शन’ पाहिले तर तेच स्वतः भ्रमंतीसाठी वेळ आणि पेट्रोल किती खर्च करीत आहेत ते लक्षात येते. मंत्र्यांच्या मोटारी, उद्योगपती, बड्या नेत्यांची चार्टर विमाने उडतच आहेत आणि लोकांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झाले ते पुरे झाले. 2022 सालात तरी शहाणे व्हा! नेते व मंत्री रोज खोटे बोलतात. त्यांचे इतके मनावर घेऊ नका. कारण शेवटी चुकीच्या माणसांना अंबारीत बसविण्याचे कार्य तुमच्याच हातून घडत असावे," असेही त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: sanjay raut targeted pm narenra modi over new Mercedes Benz car make in india saamna editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.