AAP खासदार संजय सिंहांना मोठा धक्का, ईडीच्या अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 05:17 PM2023-10-20T17:17:15+5:302023-10-20T17:19:32+5:30
गुरुवारी संजय सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. मद्य धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्या अटकेला आणि ईडीच्या कोठडीला आव्हान देणारी त्यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.
गुरुवारी संजय सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. सुनावणीदरम्यान ईडीने संजय सिंह यांच्या याचिकेला विरोध केला होता आणि म्हटले होते की, त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.
ईडीने दिल्ली मद्य धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासासंदर्भात आप खासदार संजय सिंह यांना अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर ईडीने संजय सिंह यांना ५ ऑक्टोबर रोजी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयता हजर केले. त्यावेळी न्यायालयाने संजय सिंह यांना आधी १० ऑक्टोबर आणि नंतर १३ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडीवर पाठवले होते.
दरम्यान, १३ ऑक्टोबरला ईडीच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर संजय सिंह यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. यानंतर संजय सिंह यांनी १३ ऑक्टोबरला दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या कोठडी आणि अटकेला आव्हान दिले होते.