Sanjay Singh : "CM योगींना हटवण्याचं पूर्ण प्लॅनिंग..."; संजय सिंह यांचा मोठा दावा, मोदींचाही केला उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 01:56 PM2024-07-26T13:56:59+5:302024-07-26T14:03:35+5:30
AAP Sanjay Singh And Yogi Adityanath : संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री योगींच्या बैठकीला डेप्युटी सीएम केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्या अनुपस्थितीबाबत संजय सिंह म्हणाले की, "अरविंद केजरीवाल यांनी आधीच सांगितलं होतं की, हे लोक त्यांना दोन महिन्यांत हटवतील. त्यामुळे आज जे काही घडत आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्याशिवाय शक्य नाही."
"या लोकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हटवण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग केलं आहे आणि ते तुम्हाला लवकरच दिसेल." दिल्लीचे मुख्यमंत्री अविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशमधील भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाबाबत मोठा दावा केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तुम्हाला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवू इच्छितात, असं ते म्हणाले होते.
तुमचे शत्रू तुमच्या पक्षात आहेत. तुमची लढाई तुमच्याच लोकांशी आहे. तुम्हाला हटवण्याची तयारी सुरू आहे. मला शिव्या देऊन काय होणार आहे? तुम्ही तुमची काळजी करा असं म्हटलं होतं. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, मी सत्तेसाठी नाही तर पक्षाच्या मूल्यांवर आणि तत्त्वांवर काम करतो.
योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल, १७ जुलै २०२४ रोजी आप खासदार संजय सिंह म्हणाले होते की, अरविंद केजरीवाल यांनी दोन महिन्यांपूर्वी दावा केला होता की सीएम योगी आदित्यनाथ यांना हटवले जाऊ शकते. तेव्हा मोदी, अमित शाह किंवा पक्षाच्या कोणत्याही नेत्याने याचं खंडन केलेलं नव्हतं. आता योगी आदित्यनाथ यांना हटवण्यासाठी राजकारण शिगेला पोहोचले आहे. हे खरे नसेल तर मोदीजी याचं खंडन का नाही करत? असाही सवाल विचारला होता.