कोठडीतून अन्यत्र हलविले जाण्याची सिंह यांना भीती; छळण्याचा आराेप, ईडीने शक्यता फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 14:49 IST2023-10-08T14:48:56+5:302023-10-08T14:49:49+5:30
पेस्ट कंट्रोल करण्याच्या नावाखाली आपल्याला ईडी कोठडीतून तुघलक रोड पोलिस ठाण्यात हलवून तिथे छळ करण्याचा इरादा असल्याचा आरोप करणारी याचिका संजय सिंह यांच्या वतीने करण्यात आली होती.

कोठडीतून अन्यत्र हलविले जाण्याची सिंह यांना भीती; छळण्याचा आराेप, ईडीने शक्यता फेटाळली
सुनील चावके -
नवी दिल्ली : दिल्लीच्या मद्यधोरण घोटाळ्यात अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना ईडीच्याच कोठडीत ठेवण्यात येणार असून, अन्यत्र कुठेही हलविण्यात येणार नाही, असे ईडीच्या वतीने राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांपुढे शनिवारी स्पष्ट करण्यात आले.
पेस्ट कंट्रोल करण्याच्या नावाखाली आपल्याला ईडी कोठडीतून तुघलक रोड पोलिस ठाण्यात हलवून तिथे छळ करण्याचा इरादा असल्याचा आरोप करणारी याचिका संजय सिंह यांच्या वतीने करण्यात आली होती. संजय सिंह यांना हलविण्याचे कोणतेही इरादे नसल्याचे ईडीने स्पष्ट केल्यामुळे ही याचिका निकाली काढण्यात येत असल्याचे विशेष न्यायाधीश विकास धुल यांनी स्पष्ट केले.
केवळ एकच कोठडी?
पेस्ट कंट्रोल करण्यात येत असल्याचे सांगून रात्री कोठडीबाहेर अमानवी परिस्थितीत झोपण्यास भाग पाडल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. ईडीच्या मुख्यालयात केवळ एकच कोठडी असावी, यासारखी थट्टा असू शकत नाही, असे संजय सिंह यांचे वकील म्हणाले. सिंह यांना अटक करण्यापूर्वीच पेस्ट कंट्रोल करण्याचे ठरले होते, असा दावा ईडीच्या वतीने करण्यात आला.