न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे ५१ वे सरन्यायाधीश?; इलेक्टोरल बॉण्ड्सपासून VVPAT पर्यंत घेतलेत महत्त्वाचे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:01 AM2024-10-17T10:01:19+5:302024-10-17T11:42:23+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे.
Chief Justice of India: सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सरकारला पत्र लिहलं असून त्यांच्यानंतर सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड करण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड १० नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या पदावरून निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांनी देशाच्या पुढील सरन्यायाधीशासाठी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे नाव केंद्र सरकारकडे पाठवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती सामान्यतः ज्येष्ठतेच्या तत्त्वानुसार केली जाते. त्यानुसार सरन्यायाधीस चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची शिफारस केली आहे.
भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना उत्तराधिकारी म्हणून औपचारिकपणे घोषित केले आहे. केंद्र सरकारच्या कायदा मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ११ नोव्हेंबर रोजी आपण पद सोडत असल्याने न्यायमूर्ती खन्ना त्यांचे उत्तराधिकारी असतील, असं म्हटलं आहे. सरकारने मान्यता दिल्यास न्यायमूर्ती खन्ना हे भारताचे ५१ वे सरन्यायाधीश होतील. त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असणार आहे, जो १३ मे २०२५ रोजी संपणार आहे. त्यानंतर ते निवृत्त होणार आहेत.
सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे प्रमुख आहेत, जे सर्वोच्च न्यायालय आणि देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस करतात. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे दोन वर्षे या पदावर राहिल्यानंतर निवृत्त होणार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या उत्तराधिकारीच्या नावाची शिफारस केली आहे.
कोण आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना?
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याबद्दल सांगायचे तर ते १४ वर्षांपासून दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. त्यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून कायद्याचे शिक्षण घेतले. पदवीनंतर त्यांनी १९८३ मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली. २०१९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती झाली.
न्यायमूर्ती संजीव खन्ना हे ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सहा महिन्यांच्या कार्यकाळासाठी सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारतील. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे १३ मे २०२५ पर्यंत त्यांच्या पदावर राहतील. यानंतर ते निवृत्त होणार आहेत. जानेवारी 2019 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली होती. सध्या ते कंपनी कायदा, लवाद, सेवा कायदा, सागरी कायदा, नागरी कायदा आणि व्यावसायिक कायदा यासंदर्भातील प्रकरणांचे काम पाहत आहेत. संजीव खन्ना यांनी सिनियर कौन्सिल म्हणून प्राप्तीकर विभागातही काम केलं. तसेच त्यांनी सरकारी वकील म्हणून दिल्लीत अनेक गुन्हेगारी प्रकरणात पण बाजू मांडली आहे.
Chief Justice of India DY Chandrachud has formally proposed Justice Sanjiv Khanna as his successor. In a communication to the Union government, Chief Justice Chandrachud stated that since he is demitting office on November 11, Justice Khanna would be his successor.
Upon approval… pic.twitter.com/LgH8PqvDyr— ANI (@ANI) October 17, 2024
साडेचार वर्षांच्या कार्यकाळात न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी ३५८ खंडपीठांचा भाग म्हणून काम केले असून त्यांनी ९० हून अधिक प्रकरणांचा निकाल दिला आहे. २०२३ मध्ये त्यांनी शिल्पा शैलेश प्रकरणी घटनापीठाचा निकाल दिला होता. भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना अतिरिक्त नुकसान भरपाई मिळावी या याचिकेवर निर्णय देणाऱ्या खंडपीठाचाही ते भाग होते. गेल्या वर्षी, अनुसूचित जाती आणि जमातींच्या पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचेही ते भाग होते.