राज्याचं मंत्रिमंडळ रॅलीत व्यस्त; शहीद निरीक्षकाच्या कुटुंबाकडे साऱ्यांचं दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 04:16 PM2019-03-03T16:16:14+5:302019-03-03T16:17:57+5:30

विमानतळावर भाजपा, जदयूचा एकही नेता, मंत्री उपस्थित नव्हता

On sankalp Rally Day No NDA Leader At Patna Airport To Receive Soldiers Body | राज्याचं मंत्रिमंडळ रॅलीत व्यस्त; शहीद निरीक्षकाच्या कुटुंबाकडे साऱ्यांचं दुर्लक्ष

राज्याचं मंत्रिमंडळ रॅलीत व्यस्त; शहीद निरीक्षकाच्या कुटुंबाकडे साऱ्यांचं दुर्लक्ष

googlenewsNext

पाटणा: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेल्या सीआरपीएफ निरीक्षकाचा मृतदेह आज सकाळी पाटण्यात आणण्यात आला. मात्र यावेळी विमानतळावर राज्यातील सत्ताधारी पक्षाचा एकही नेता, मंत्री उपस्थित नव्हता. राजधानी पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्प सभा असल्यानं एनडीएचे नेते, राज्याचे मंत्री व्यस्त होते. याबद्दल शहीद निरीक्षकाच्या कुटुंबीयांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सत्ताधारी पक्षांचे नेते आणि मंत्री विमानतळावर आले होते.

सीआरपीएफचे निरीक्षक पिंटू कुमार सिंह यांचं पार्थिव आज सकाळी सव्वा आठ वाजता पाटण्यातील विमानतळावर आणण्यात आलं. त्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. राज्यातील एक निरीक्षक शहीद होतो आणि त्याच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार येत नाहीत, ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याची भावना पिंटू कुमार सिंह यांचे काका संजय सिंह यांनी व्यक्त केली. पिंटू कुमार सिंह बेगुसरायमधील धनचक्की गावचे रहिवासी होते. विमानतळावरुन त्यांचं पार्थिव त्यांच्या गावी नेण्यात आलं. 

पिंटू कुमार सिंह यांचं पार्थिव नेण्यासाठी त्यांचं कुटुंब पाटण्यातील विमानतळावर आलं होतं. यावेळी जिल्हा दंडाधिकारी कुमार रवी, वरिष्ठ पोलीस अधिकारी गरिमा मलिक, सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा आणि लोक जनशक्ती पार्टीचे खासदार चौधरी महबूब अली कैसेर उपस्थित होते. 'मला कोणतंही राजकारण करायचं नाही. मी केवळ श्रद्धांजली वाहायला आलो आहे,' असं यावेळी झा म्हणाले. शहीद निरीक्षकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यायला हवं होतं. त्यांना वेळ नव्हता, तर किमान उपमुख्यमंत्र्यांना पाठवायला हवं होतं, असं कैसेर म्हणाले. कैसेर यांची लोक जनशक्ती पार्टी एनडीएमध्ये सहभागी आहे. 

16 फेब्रुवारीला बिहारमधील दोन सीआरपीएफ जवानांचे पार्थिव पाटण्यात आणले होते. या दोन्ही जवानांनी 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलं. त्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटणा विमानतळावर आले होते. मात्र आज मुख्यमंत्री किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणताही सहकारी सीआरपीएफच्या निरीक्षकाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी आला नाही. सत्ताधारी भाजपा आणि जदयूचे नेते, मंत्री, केंद्रीय मंत्री संकल्प रॅलीमध्ये आहेत. 
 

Web Title: On sankalp Rally Day No NDA Leader At Patna Airport To Receive Soldiers Body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.