संसारपूर, एक आगळंवेगळं गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:41 AM2018-03-29T03:41:20+5:302018-03-29T03:41:20+5:30
पंजाबमधील संसारपूर हे गाव फारसं कोणाला माहीतही नाही. हे जालंधर जिल्ह्यातील छोटंसं गाव. वस्ती पाच हजारांच्या आसपास.
पंजाबमधील संसारपूर हे गाव फारसं कोणाला माहीतही नाही. हे जालंधर जिल्ह्यातील छोटंसं गाव. वस्ती पाच हजारांच्या
आसपास. काही महिन्यांनी ते गाव सर्वांना माहीतही होईल. पण आतापर्यंत पंजाबींखेरीज इतरांना त्या गावची फारशी ओळख नाही. त्या गावावर आधारित येणाऱ्या पंजाबी चित्रपटाचं नाव आहे ‘खिडो खुंडी’. या नावातूनही काहीच अर्थबोध होत नाही. खिडो म्हणजे जुन्या कपड्यांपासून तयार करण्यात आलेला बॉल आणि खुंडी म्हणजे फळकुटापासून तयार केलेली हॉकी स्टिकसारखी काठी.
या गावावर या नावाचा चित्रपट येतो आहे, याचं कारण संसारपूरनं देशाला अनेक हॉकीपटू दिले
आहेत. एके काळी कापडी बॉल व स्टिकसारखं फळकूट घेऊ न
येथील तरुण मुलं हॉकी खेळायचं. हॉकीपटूंचं गाव म्हणून ते ओळखलं जातं. म्हणूनच रोहित जुगराज यांना त्या गावावर चित्रपट तयार करावा, असं वाटलं. खेळाशी संबंधित दंगल, सुल्तान, चक दे इंडिया चित्रपट जोरात चालल्यानं त्यांना संसारपूरवर चित्रपट बनवावा असं त्यांनी
ठरवलं. या गावानं आतापर्यंत आॅलिम्पिकसाठी १४ हॉकीपटू दिले आहेत. त्यांनी जिंकलेल्या पदकांची संख्या आहे २७. हे हॉकीपटू भारतासाठीच नव्हे, तर कॅनडा, केनिया, नैरोबी, मोम्बासा या देशांसाठीही खेळले. एका विशिष्ट आॅलिम्पिकमध्ये संसारपूरचे चक्क सात हॉकीपटू खेळले होते. त्यापैकी भारतीय संघातून ५ व केनियातून दोघे. याखेरीज पंजाबसाठी वा देशपातळीवर खेळलेले हॉकीपटू वेगळेच. हल्ली संसारपूरमध्ये हॉकीची आबाळ होत आहे. कित्येक वर्षांत या गावानं एकही नामवंत हॉकीपटू दिलेला नाही. केंद्र वा राज्य सरकार या खेळासाठी मदत करीत नाही, असं तेथील हॉकीपटूंचं म्हणणं आहे. शिवाय गेल्या दशकात पंजाबला अमली पदार्थांनी जो विळखा घातला, त्यात या गावातले अनेक तरुणही अडकले, असं सांगण्यात येतं. तरुण खेळाकडून अंमली पदार्थांकडे वळल्याचं दु:ख संसारपूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष जर्नेल सिंग खुल्लर व्यक्त करतात. पण आता प्रमाण कमी होत चाललं आहे. त्यामुळे पुन्हा एकवार हॉकीवर संसारपूरचा दबदबा दिसेल, अशी आशा ते व्यक्त करतात. ’खिडो खुंडी’ चित्रपटामुळेही तरुणांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास अनेक जण व्यक्त करतात.