गांधींचे समाजजीवन देशात रुजविण्याची गरज; पद्मश्री बाबा योगेंद्र यांची खास मुलाखत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 03:33 PM2019-10-16T15:33:27+5:302019-10-16T15:47:24+5:30
‘गांधींनी देशाला दिलेल्या विचारांमध्ये पवित्रतेचे भाव आहेत. देशाला शुद्ध विचार दिला. फाळणीच्या मुद्यावर त्यांच्याशी मी कधीही सहमत होणार नाही, पण त्यांचे समाजजीवन तळागाळापर्यंत रुजविण्याची आज खरी गरज आहे.’
नितीन नायगांवकर
नवी दिल्ली - ‘गांधींनी देशाला दिलेल्या विचारांमध्ये पवित्रतेचे भाव आहेत. देशाला शुद्ध विचार दिला. फाळणीच्या मुद्यावर त्यांच्याशी मी कधीही सहमत होणार नाही, पण त्यांचे समाजजीवन तळागाळापर्यंत रुजविण्याची आज खरी गरज आहे,’ असे मत संस्कार भारतीचे संस्थापक पद्मश्री बाबा योगेंद्र (९५) यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. ललित कला अकादमी येथे महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित चित्र-शिल्प प्रदर्शनाला त्यांनी आज (बुधवार) भेट दिली. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात काँग्रेसशी जुळलेले अॅड. विजय बहादूर श्रीवास्तव यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले आहेत.
महात्मा गांधींच्या नावाने फक्त राजकारण होतेय असे वाटते का?
- ‘माझ्या जिवंतपणी देशाचे तुकडे होऊ देणार नाही’ असे म्हणणाऱ्या गांधींनी कुणाच्यातरी प्रेमाखातर देशाची फाळणी केली. पण, आपण गांधी या व्यक्तीच्या महानतेविषयी आपण बोलुया. गांधी आणि राजकारण या विषयावर मी बोलणार नाही. त्यांचे साधक जीवन आणि त्यांनी इंग्रजांशी वेळोवेळी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे. गांधींच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी घटना लोकांना सांगाव्या लागतील. अहिंसा आणि हरीजन हे दोन शब्द त्यांनी दिले. आज एकविसाव्या शतकात इग्लंडमध्ये कुणाच्या तरी मनात गांधींची मूर्ती तयार करण्याचे भाव निर्माण होतात, यावरून त्यांची महानता स्पष्ट होते.
महापुरुषांची नावे वापरली जात आहेत असे नाही वाटत का?
- आपल्या पुर्वजांचे, आजोबा-पणजोबांचे स्मरण करणे ही देशाची संस्कृती आहे. आम्ही देखील सकाळी उठून प्रार्थना करतो, त्यात महात्मा गांधींसह ५९ महापुरुषांची नावे आहेत. ज्याने जो विचार दिला त्याची गाथा गायलीच जाणार. ज्यांचे स्मरण आम्ही करतो त्यात देशाच्या कानाकोपऱ्यातील महापुरुषांचा समावेश आहे. पण, लोकांना दोषही बघायचा असतो. आता महापुरुषांचे स्मरण करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी राहू शकते आणि त्याला आपला इलाज नाही.
भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्याचा उल्लेख जाहीरनाम्यात केला आहे, त्याबद्दल काय वाटते?
- सावरकरांना फार पूर्वीच भारतरत्न मिळायला हवा होता. त्यांचा देशासाठी संघर्ष आणि त्यांचे योगदान फार मोठे आहे. दोन जन्मांची शिक्षा कुणाला मिळाली आहे? एवढ्या यातना सहन केल्यानंतर नंतरच्या सत्तेनेही त्यांच्यावर अन्याय केला. संस्कार भारती त्यांच्या जन्मदिनाला देशभर कार्यक्रम आयोजित करीत असते.
संस्कार भारतीच्या कामावर समाधानी आहात का?
- समाधान खूप मोठा शब्द आहे. पण आनंद मात्र नक्कीच आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील कलावंतांमध्ये एकीचा भाव निर्माण करण्यात संस्कार भारतीला यश आले आहे. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या साडेतीन हजार कलावंतांमध्ये नागालँड, मिझोरामचे साडेचारशे कलावंत सहभागी होतात तेव्हा आनंद होतो. केरळमधील वायनाड जिल्ह्यात ८९ टक्के मुस्लीम-ख्रिश्चन नागरिक असताना तिथे संस्कार भारतीचे काम सुरू आहे, याचा विशेष आनंद आहे. याच गोष्टी मला या वयात देशभर फिरण्याची प्रेरणा देतात.