संस्कृत बँड आता परदेश गाजविणार
By admin | Published: June 22, 2016 02:47 AM2016-06-22T02:47:37+5:302016-06-22T02:47:37+5:30
काही संगीतकार आणि गायकांनी पौराणिक संस्कृत ग्रंथांतील मंत्र आणि श्लोकांना संगीतबद्ध करून ‘धु्रव’ नावाचा वाद्यवृंद साकारला आहे.
भोपाळ : काही संगीतकार आणि गायकांनी पौराणिक संस्कृत ग्रंथांतील मंत्र आणि श्लोकांना संगीतबद्ध करून ‘धु्रव’ नावाचा वाद्यवृंद साकारला आहे. देशात लोकप्रिय ठरल्यानंतर आता हा वाद्यवृंद परदेशात सुरांची जादू दाखविण्यास सज्ज झाला आहे.
गेल्यावर्षी वसंत पंचमीला अस्तित्वात आलेल्या या वाद्यवृंदाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ संस्कृतमध्ये गातो. संजय द्विवेदी यांना ध्रुवची कल्पना सुचली. ते स्वत: संस्कृतचे विद्वान व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आहेत. त्यांनी संस्कृतमध्ये अनेक नाटकेही लिहिली आहेत. ‘धुव्र’चे देशभरात १२ कार्यक्रम झाले असून, हा वाद्यवृंद आता परदेशात आपला नावलौकिक करण्याच्या तयारीत आहे. संगीत कोणत्याही प्रकारचे असो ते लोकांना आवडतेच. मात्र, शास्त्रीय संगीत सर्व पिढ्यांतील लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. संगीताचा हा प्रकार थेट आत्म्याला स्पर्श करतो.
माझे श्रोते किंवा चाहते केवळ शास्त्रीय संगीत आवडणारे मूठभर लोक असावेत हे मला मान्य नव्हते. त्यामुळे हे संगीत तरुण पिढीपर्यंत नेण्यासाठी मी माझे मित्र वैभव संतोरे, ज्ञानेश्वरी परसाई यांच्या सोबतीने २४ फेब्रुवारी २०१५ रोजी एक मोठे पाऊल उचलले. आम्ही पौराणिक ग्रंथातील मंत्र आणि श्लोक घेऊन त्यांना संगीतबद्ध केले. आम्ही हे श्लोक आणि मंत्रांचा पाश्चात्त्य संगीताशी मिलाप घडवून आणू इच्छित
होतो. आमचा हा प्रयत्न लोकांना आवडतोय याचा आम्हाला आनंद आहे. (वृत्तसंस्था)