मनाच्या शुद्धीकरणासाठी संस्कृतला प्रोत्साहन देणे गरजेचे
By admin | Published: June 29, 2015 12:15 AM2015-06-29T00:15:54+5:302015-06-29T00:17:25+5:30
संस्कृत भाषेला चालना दिली पाहिजे. कारण संस्कृत भाषा लोकांच्या मनाचे शुद्धीकरण करते आणि अशा प्रकारे संपूर्ण जगाला पवित्र करते, असा दावा भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे केला.
बँकॉक : संस्कृत भाषेला चालना दिली पाहिजे. कारण संस्कृत भाषा लोकांच्या मनाचे शुद्धीकरण करते आणि अशा प्रकारे संपूर्ण जगाला पवित्र करते, असा दावा भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे केला. ६० देशांतील संस्कृत विद्वानांच्या पाच दिवसीय संमेलनाचे उद्घाटन रविवारी त्यांच्या हस्ते झाले.
संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात सुषमा स्वराज यांनी संस्कृतला ‘आधुनिक आणि सार्वत्रिक’ भाषा संबोधत याच्या परंपरेची गंगा नदीशी तुलना केली. ६०० हून अधिक संस्कृत विद्वानांची उपस्थिती असलेल्या या संमेलनात सुषमा यांनी आपले संपूर्ण भाषण संस्कृतमध्ये दिले.
१६ व्या जागतिक संस्कृत संमेलनाच्या प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करताना सुषमा यांनी परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव (संस्कृत) असे स्वतंत्र पद तयार करण्याची घोषणा केली.
भाषेची ओळख, अनुवाद, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम गुप्तचर सेवा यासारख्या अन्य क्षेत्रांत सॉफ्टवेअर विकसित करण्यात संस्कृत महत्त्वाची भूमिका निभावू शकते, असा मतप्रवाह वैज्ञानिकांत असल्याचे स्वराज म्हणाल्या.
जागतिक संस्कृत संमेलनात प्रथमच सुषमा स्वराज यांच्या पातळीचा एखादा केंद्रीय मंत्री सामील झाला. यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसाराला किती महत्त्व देते याचे संकेत मिळतात. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी दोन जुलै रोजी या संमेलनाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत. पहिले संस्कृत संमेलन १९७२ मध्ये दिल्लीला झाले होते.
यावेळी भारतातून २५० संस्कृत विद्वानांनी संमेलनाला उपस्थिती लावली. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्कृत भारती या संस्थेचे ३० प्रतिनिधी होते. संस्कृत भारतीच्या भूमिकेचेही स्वराज यांनी यावेळी कौतुक केले. (वृत्तसंस्था)
शास्त्र-विज्ञानातील अंतर दूर करण्यासाठी प्रयत्न
४सुषमा स्वराज म्हणाल्या, ‘गोमुखातून उगम पाऊन गंगा सागरला (येथे समुद्राला मिळते) पोहोचल्यानंतरही गंगा नदी पवित्र राहते. तिने उपनद्यांना पवित्र बनविले. याचप्रमाणे ‘संस्कृत’ पवित्र असून अन्य कोणत्याही भाषा तिच्या संपर्कात आल्यानंतर त्या सर्वांना पवित्र बनविले.’ या पार्श्वभमीवर संस्कृतचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे असून यामुळे लोकांच्या मनाचे शुद्धीकरण होईल व अशा प्रकारे संपूर्ण जग पवित्र होईल.
४‘संस्कृतच्या ज्ञानाने तापमान वाढ, सभ्यतांमधील संघर्ष, गरिबी, दहशतवाद यासारख्या समकालीन समस्यांवर तोडगा निघू शकतो. आमचा प्रयत्न शास्त्र आणि विज्ञान यांच्या अभ्यासातील अंतर दूर करण्याच्या दिशेने सुरू आहे,’ असे त्या म्हणाल्या.