स्वयंघोषित संत रामपाल दोन्ही हत्या प्रकरणांमध्ये दोषी; हिसार कोर्टाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 01:37 PM2018-10-11T13:37:05+5:302018-10-11T13:51:09+5:30
16 आणि 17 ऑक्टोबरला शिक्षा सुनावणी जाणार
चंदिगढ: स्वयंघोषित संत रामपालला हिसारमधील न्यायालयानं दोन हत्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात न्यायालय 16-17 ऑक्टोबरला शिक्षा सुनावणार आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानं न्यायालयाच्या निकालापूर्वी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. न्यायालयात सुनावणी सुरू असताना तीन किलोमीटर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रामपालवर असलेल्या हत्येच्या आरोपांवर 24 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र राम रहिमवरील आरोपांवरील सुनावणीवेळी झालेला हिंसाचार लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव ऑगस्टमधील सुनावणी टाळण्यात आली. रामपालवर असलेल्या देशद्रोहाच्या आरोपावर 19 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
रामपालच्या सतलोक आश्रमात 18 नोव्हेंबर 2014 रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तर दुसऱ्या एका प्रकरणात रामपालचे भक्त पोलिसांना भिडले होते. तब्बल 10 दिवस पोलीस आणि रामपालचे भक्त यांच्यात धक्काबुकी झाली. यावेळी झालेल्या हिंसाचारात चार महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये रामपाल दोषी आढळला आहे. त्याला 16 आणि 17 ऑक्टोबरला शिक्षा सुनावण्यात येईल.
18 नोव्हेंबर 2014 रोजी रामपालच्या सतलोक आश्रमात एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. ही महिला रामपालची भक्त होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणीदेखील रामपालविरोधात सुरू असलेल्या इतर खटल्यांच्या सुनावणीसोबत घेण्यात आली. तर दुसरं प्रकरण 19 नोव्हेंबर 2014 चं आहे. त्यावेळी रामपालचे भक्त आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाली. यावेळी हिंसाचारदेखील झाला होता. त्यात 4 महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणांमुळे रामपालच्या अडचणी वाढल्या. आता या दोन्ही हत्या प्रकरणांमध्ये रामपाल दोषी आढळला आहे.