संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 09:42 PM2024-12-11T21:42:13+5:302024-12-11T21:42:38+5:30

MP Bajrang Sonawane Meet Amit Shah: बीड जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांना एक पत्र दिले आहे. 

Santosh Deshmukh murder case in beed district maharashtra, should be probed by CBI; MP Bajrang Sonavane meet the Union Home Minister Amit Shah! | संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट!

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट!

MP Bajrang Sonawane Meet Amit Shah:  नवी दिल्ली : महाराष्ट्रातील बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहण आणि हत्येने बीड जिल्हा हादरला आहे. त्यामुळे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासाठी खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी बीड जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत बजरंग सोनवणे यांनी अमित शाह यांना एक पत्र दिले आहे. 

बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत खराब झालेली आहे. कोणत्याही प्रकरणात अशासकिय लोकांचा हस्तक्षेप होत असल्याने पोलीस यंत्रणा हातचे बाहूले बनून काम करत आहेत. अर्थातच पोलीस निपक्षपातीपणे काम करत नाहीत. परिणामी, जिल्ह्यात वाळूमाफिया, भुमाफिया, गुटखा माफिया, खंडणी, खून, अवैध शस्त्रांचा व्यापार फोफावत आहे. परळीत अमोल डुबे यांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली. यानंतर त्यांना अंधाऱ्या रात्री घाटात सोडून दिले, असे बजरंग सोनवणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांनी पवनचक्की प्रकरणात खंडणीला विरोध केला म्हणून अपहरण करून हत्या केली. संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याचे कळताच मी जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांना सलग फोन केले. मॅसेजेस केले परंतु संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला. पोलीस अधिक्षक यांचा संपर्क होऊ शकला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. यामुळे पोलीस अधिक्षकांच्या भुमिकेबाबत संशय निर्माण होत आहे, असे बजरंग सोनवणे यांनी पत्रात नमूद केले आहे. 

बीड जिल्हा पोलीसांकडून खोट्या केसेस करणे आणि खऱ्या अपराधाकडे दुर्लक्ष करणे सर्रासचे झाले आहे. यामुळे कायद्याची अमलबजावणी होणे अशक्य झाले आहे. पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती गोवर्धन सानप हे दोन दिवस बेपत्ता होते. त्यांचा ग्रामस्थांनी शोध घेतला परंतु दोन दिवसांनी त्यांचे प्रेत शेतात आढळून आले. हा मृत्यू कशामुळे झाला, याचेही ठोस कारण पोलीसांनी दिलेले नाही. याबाबतही संशय आहे, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.
 
याचबरोबर, अशा अपहरणांच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, याच बरोबर जिल्हा पोलीस दलाबाबत सामान्य माणसांच्या मनात अविश्वास निर्माण झालेला आहे. यामुळे केंद्रीय सुरक्षा यंत्रणेकडून विशेष पथक बीड जिल्ह्यात पाठवून याठिकाणी कारवाया कराव्यात, जेणेकरून पोलीसांकडून आयपीसी कलमांचा दुरूपयोग होणार नाही, पोलीस यंत्रणा कोणाच्या दबावात काम करणार नाही. पवनचक्की कंपन्यांच्या गुडांनी जो गुन्हेगारीचा आलेख वाढविण्याचे काम केले आहे तो आलेखही कमी होईल, गुंडगिरीचा वापर करत असल्यामुळे पवनचक्की कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत असेही  बजरंग सोनवणे यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Santosh Deshmukh murder case in beed district maharashtra, should be probed by CBI; MP Bajrang Sonavane meet the Union Home Minister Amit Shah!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.