‘सपनों की उडान’! अनाथ, गरीब मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिले पंख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 11:39 AM2023-05-07T11:39:55+5:302023-05-07T11:40:24+5:30
झारखंडमध्ये उपक्रम.
कलामती (झारखंड) : झारखंडच्या दुर्गम खुंटी गावातील अनाथाश्रमात लहानाची मोठी झालेल्या एलिशा हासा (वय १९) हिचा आतापर्यंतचा जीवन प्रवास संघर्ष, समस्या व कठीण परिश्रमांनी भरलेला होता. वंचित वर्गातील विद्यार्थिनींसाठी असलेल्या शाळेत ११ वीला प्रवेश घेण्यापूर्वी अभियांत्रिकी हा शब्द तिच्या कानावरूनही गेला नव्हता.
जिला धडपणे हिंदीसुद्धा बोलता येत नव्हती. अशा या अनाथ, आदिवासी मुलीने सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या जेईई मेन्समध्ये बाजी मारली आहे. तिची स्वप्ने मोठी असून, ती आपल्यासारख्या दारिद्य्राने पिचलेल्या मुलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू इच्छिते.
एलिशा आता जेईई-ॲडव्हान्सची तयारी करत आहे. तिने सांगितले, मी जेव्हा नऊ वर्षांची होते, तेव्हा माझे मातृ-पितृ छत्र हरपले. मला एका अनाथालयात पाठवण्यात आले. तेथून मला २०१५ मध्ये शिक्षणासाठी कस्तूरबा गांधी कन्या विद्यालय, कलामती खुंटी येथे पाठविण्यात आले. मला ‘सपनों की उडान’ उपक्रमाची माहिती मिळाली. ज्याने माझ्या स्वप्नांना पंख दिले. मी रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. मात्र, गेल्यावर्षी यश मिळू शकले नाही. यावर्षी मला अनुसूचित जनजाती (एसटी) प्रवर्गातून संपूर्ण देशात १,७८८ वे स्थान प्राप्त झाले आहे.
एलिशा एकटी नाही. तिच्यासारखे अन्य नऊ विद्यार्थीही आहेत. ज्यांनी प्रतिकूल परिस्थिती असताना व वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत हिंदी माहीत नसताना कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयात प्रवेश घेऊन जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण केली. आता या सर्वांनी जेईई-ॲडव्हान्सची तयारी सुरू केली आहे. गरिबीतून बाहेर पडून माओवादग्रस्त खुंटी जिल्ह्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हे या सर्वांचे उद्दिष्ट आहे. सर्वांनी एका सुरात त्यांच्या यशाचे श्रेय ‘सपनों की उडान’ला दिले. वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशासाठी विशेष कोचिंग देण्याच्या उद्देशाने खुंटी जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम सुरू केला आहे.
बिरसा मुंडा यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय
ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारणारे आदिवासी नेते बिरसा मुंडा यांची वंशज सरस्वती मुंडा हिला अत्यंत गरिबीमुळे या विद्यालयात प्रवेश देण्यात आला होता. काहीतरी करून दाखवण्याची चमक तिच्या डोळ्यात दिसते. ती म्हणाली, “मला माझे आजोबा बिरसा मुंडा यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. मला माझ्या गावातील लोकांच्या जीवनात ज्ञानाचा दिवा लावायचा आहे.