धक्कादायक! YouTube वर पाहून केलं पोटाचं ऑपरेशन; मुलाचा मृत्यू होताच पळून गेला डॉक्टर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 02:27 PM2024-09-08T14:27:46+5:302024-09-08T14:28:53+5:30

उलट्या आणि पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेलेल्या एका मुलाला ऑपरेशननंतर आपला जीव गमवावा लागला आहे.

saran boy died when surgery done by docter after watching youtube | धक्कादायक! YouTube वर पाहून केलं पोटाचं ऑपरेशन; मुलाचा मृत्यू होताच पळून गेला डॉक्टर अन्...

धक्कादायक! YouTube वर पाहून केलं पोटाचं ऑपरेशन; मुलाचा मृत्यू होताच पळून गेला डॉक्टर अन्...

बिहारच्या सारण जिल्ह्यातील मढ़ौरामध्ये, उलट्या आणि पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेलेल्या एका मुलाला ऑपरेशननंतर आपला जीव गमवावा लागला आहे. हा डॉक्टर फ्रॉड असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यूट्यूबवर पाहिल्यानंतर डॉक्टरने मुलाच्या पोटाचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन दरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक झाली. मुलाच्या मृत्यूनंतर डॉक्टर क्लिनिक बंद करून पळून गेला.

ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उशिरा मढ़ौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धर्मबागी मार्केटमध्ये असलेल्या गणपती सेवा सदनमध्ये घडली आहे. गोलू साह (१५ वर्षे) असं या मुलाचं नाव आहे. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून क्लिनिकची तपासणी केली. मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी छपरा सदर रुग्णालयात पाठवला. गोलू हा त्याच्या आई-वडिलांचा मोठा मुलगा होता. मुलाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की, मुलाला आधी पोटासंबंधित त्रास होता.

या घटनेबाबत मुलाचे आजोबा प्रल्हाद प्रसाद साह यांनी सांगितलं की, त्यांच्या नातवाला उलट्या आणि पोटदुखीची तक्रार होती. यानंतर त्यांनी नातवाला उपचारासाठी गणपती सेवा सदन रुग्णालयात दाखल केलं. क्लिनिक चालवणारा फ्रॉड डॉक्टर अजित कुमार पुरी याने त्यांना न सांगता आणि कुटुंबीयांची परवानगी न घेता ऑपरेशन केलं.

यूट्यूबवर पाहून डॉक्टर ऑपरेशन करत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. यावेळी डॉक्टरने मुलाच्या वडिलांसह कंपाउंडरला डिझेल आणण्यासाठी पाठवलं होतं. गोलूच्या पोटात प्रचंड दुखू लागल्यावर त्याचे आजोबा प्रल्हाद यांनी डॉक्टरला याबाबत माहिती दिली. यावर डॉक्टरने त्यांना खडसावलं आणि मी डॉक्टर आहे की तुम्ही... असा प्रश्नही विचारला होता. 

ऑपरेशन दरम्यान मुलाची प्रकृती बिघडल्यावर डॉक्टरने स्वतः मुलाला रुग्णवाहिकेत बसवलं आणि सोबत त्याच्या आजीला देखील घेतलं आणि पाटणा येथील रुग्णालयात नेलं. रुग्णालयात जात असताना वाटेतच मुलाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर मृतदेह मागे टाकून डॉक्टर बॅग घेऊन पळून गेला. तिथून त्याची आजी कशीतरी नातवाचा मृतदेह घेऊन परतली.

या प्रकरणी सारणचे पोलीस अधीक्षक डॉ. कुमार आशिष यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांच्या जबाबावरून स्थानिक मधुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्रॉड डॉक्टर आणि त्या क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलीस छापे टाकत आहेत.
 

Web Title: saran boy died when surgery done by docter after watching youtube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.