भयंकर! स्कूल व्हॅनला भीषण आग, चालक गेला पळून; मुलांनी खिडकीतून उड्या मारून वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 07:39 PM2022-05-18T19:39:30+5:302022-05-18T19:41:33+5:30
आग लागल्याचे समजताच चालकाने सर्वप्रथम मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीच्या मोठ्या ज्वाळा पाहून तो पळून गेला.
नवी दिल्ली - बिहारच्या तरैया येथे बुधवारी मोठी दुर्घटना टळली. एका पब्लिक स्कूल व्हॅनला अचानक आग लागली आणि त्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने जीव वाचवण्यासाठी मुलांनी जळत्या व्हॅनमधून उड्या मारल्या. जिल्ह्यातील तरैया येथील सारण पब्लिक स्कूलच्या स्कूल व्हॅनला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटना घडली त्यावेळी ही व्हॅन मुलांना शाळेतून घरी सोडण्यासाठी जात होती आणि स्कूल व्हॅनमध्ये एकूण 10 मुलं-मुली बसल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कूल व्हॅन चालकाने वाहन थांबवून ते चेक केलं. इंजिन उघडले असता पाईपमधून गळती होत असल्याचे त्याने पाहिले. इंजिन गरम होते आणि डिझेल पडत असल्याने आग लागली. आग लागल्याचे समजताच चालकाने सर्वप्रथम मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीच्या मोठ्या ज्वाळा पाहून तो पळून गेला. मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आगीचे लोळ पाहून मुलांनी व्हॅनमधून उड्या मारल्या आणि पळायला सुरुवात केली.
व्हॅन जळत राहिली. याच दरम्यान कोणीतरी अग्निशमन दलाला माहिती दिली आणि काही वेळातच अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांसह नागरिकांनी आग नियंत्रणात आणण्यास मदत केली. 25 मिनिटांत कार जळून खाक झाली. कोणत्याही मुलाला जास्त दुखापत झाली नसली तरी किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुलांच्या पालकांसह शेकडो लोक घटनास्थळी जमा झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.