आरएसएस-देवबंदमध्ये राष्ट्रध्वजावरून सरबत्ती

By admin | Published: January 11, 2016 02:50 AM2016-01-11T02:50:57+5:302016-01-11T02:50:57+5:30

देशभरातील मदरशांमध्ये यंदाच्या प्रजासत्ताकदिनी तिरंगा फडकवावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित मुस्लिम राष्ट्रीय मंचने केले आहे

Sarbatta on national flag in RSS-Deoband | आरएसएस-देवबंदमध्ये राष्ट्रध्वजावरून सरबत्ती

आरएसएस-देवबंदमध्ये राष्ट्रध्वजावरून सरबत्ती

Next

नवी दिल्ली/सहारनपूर (यूपी) : देशभरातील मदरशांमध्ये यंदाच्या प्रजासत्ताकदिनी तिरंगा फडकवावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित मुस्लिम राष्ट्रीय मंचने केले आहे. अर्थात दारुल उलूम देवबंदने संघाच्या या कृतीचा जोरदार विरोध दर्शवला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या नागपूरच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवून त्यास वंदन करील काय? असा बोचरा सवाल दारुल उलूम देवबंदने यानिमित्ताने उपस्थित केला आहे.
मुस्लिम राष्ट्रीय मंचचे उत्तर प्रदेश समन्वयक मोरध्वज सिंह यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. संपूर्ण भारतात आम्ही ही मोहीम राबवत आहोत. ‘झंडा फहरानी’ या नावाने आखण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत मदरशांना पत्र पाठवून यंदाच्या प्रजासत्ताकदिनी आपापल्या परिसरात झेंडावंदन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अयोध्येतील राममंदिराच्या मुद्यावरही मुस्लिम राष्ट्रीय मंचने भाष्य केले. सर्व समुदायास विश्वासात घेतल्यानंतरच अयोध्येत राममंदिर उभारले जाईल, असे मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेशकुमार म्हणाले. मंचचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफजल यांनीही सर्व समुदायास विश्वासात घेतल्यानंतरच अयोध्येत राममंदिर उभारले जाईल, असे सांगत या मुद्यावर मुस्लिम व अन्य समुदायांमध्ये चर्चा गरजेची असल्याचे सांगितले.
देवबंदची तीव्र प्रतिक्रिया
संघ नागपूरच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवणार का? राष्ट्रगीतावर संघाचा विश्वास आहे का? देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मदरशांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या स्वातंत्र्य लढ्यात संघाचे योगदान काय? असे सवाल दारुल उलूम देवबंदने यानिमित्ताने केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ एका झेंड्याला मानतो, हे सर्वश्रुत आहे. संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात केवळ एकाच झेंड्याला वंदन केले जाते, अशा स्थितीत मदरशांना सल्ला वा आवाहन करण्याचा संघाला कुठलाही अधिकार नाही. प्रजासत्ताकदिनी झेंडावंदन करायचे वा नाही, हा सर्वस्वी मदरशांचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया देवबंदचे माध्यम सचिव मौलाना अशरफ उस्मानी यांनी दिली.

Web Title: Sarbatta on national flag in RSS-Deoband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.