मेट्रोच्या दरवाज्यात साडी अडकली; महिला फरफटत गेली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 03:52 PM2019-04-16T15:52:52+5:302019-04-16T15:54:01+5:30
मेट्रोतून उतरल्यानंतर स्वयंचलित दरवाजामध्ये तिच्या साडीचा पदर अडकला. दरवाजा बंद झाल्याने पदर तिला सोडविता आला नाही आणि मेट्रो सुरु झाली.
नवी दिल्ली : लोकलमधून पडून अपघात होण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. यामुळे मेट्रो ही सर्वात सुरक्षित समजली जात होती. मात्र, दिल्लीतील आजची एक घटना थरकाप उडविणारी होती. दिल्ली मेट्रोच्या दरवाजामध्ये एका महिलेच्या साडीचा पदर अडकल्याने ही महिला मेट्रोसोबत फरपटत गेली. यामुळे तिच्या डोक्याला मार लागला आहे.
ही महिला आपल्या मुलीसह नवादा येथून येत होती. यावेळी मेट्रोतून उतरल्यानंतर स्वयंचलित दरवाजामध्ये तिच्या साडीचा पदर अडकला. दरवाजा बंद झाल्याने पदर तिला सोडविता आला नाही आणि मेट्रो सुरु झाली. यामुळे ही महिला खाली प्लॅटफॉर्मवर पडली आणि मेट्रोसोबत फरफटत गेली.
यावेळी मेट्रोमधील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत आपत्कालीन बटन दाबले आणि पायलटला मेट्रो थांबविण्याचा इशारा दिला. यामुळे ही महिला वाचली. मात्र, तिच्या डोक्याला मार लागला.
महिलेचे पती जगदीश प्रसाद यांनी सांगितले की, तिला वाचविल्यानंतर हॉस्पटलमध्ये भरती केल्याचा फोन करण्यात आला. मुलीने हा फोन केला.
ही घटना दिल्लीतील मोतीनगर मेट्रो स्टेशनवर घडली. यामुळे राजेंद्र नगरदरम्यानची मेट्रोसेवा काही काळासाठी विस्कळीत झाल्याचे मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.